डेअरडेव्हिल्स-रॉयलचे लक्ष्य ‘विजय’
By Admin | Updated: April 26, 2015 01:37 IST2015-04-26T01:37:51+5:302015-04-26T01:37:51+5:30
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे आयपीएल-८ मध्ये रविवारी आमने-सामने येतील, तेव्हा उभय संघांचे लक्ष्य ‘विजयी’ लय कायम राखणे हेच असेल.

डेअरडेव्हिल्स-रॉयलचे लक्ष्य ‘विजय’
नवी दिल्ली : घरच्या मैदानावर दोन वर्षांत पहिला विजय साजरा करणारा दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि मागच्या सामन्यात दमदार पुनरागमन करणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे आयपीएल-८ मध्ये रविवारी आमने-सामने येतील, तेव्हा उभय संघांचे लक्ष्य ‘विजयी’ लय कायम राखणे हेच असेल.
डेअरडेव्हिल्सने मुंबई इंडियन्सला आठ गड्यांनी नमविले. कोटलावर २१ एप्रिल २०१३ नंतर त्यांचा हा पहिलाच विजय होता. सलग नऊ सामने गमाविण्याची शृंखला मोडीत काढण्याचे मोठे समाधान दिल्लीला मिळाले. येथे होणाऱ्या दोन्ही सामन्यांत विजय मिळविण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. आरसीबीविरुद्ध लढतीनंतर दिल्लीला १ मे रोजी येथे पंजाबविरुद्ध खेळायचे आहे.
दिल्लीची मोहीम चढ-उताराची ठरली. पहिले दोन्ही सामने गमाविल्यानंतर या संघाने पुढचे दोन्ही सामने जिंकले. सहा सामन्यात तीन विजयांसह त्यांचे सहा गुण आहेत. आरसीबीचीही स्थिती अशीच आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर हा संघ सलग तीन सामने हरला. त्यांचे पाच सामन्यांत चार गुण आहेत. त्यांची सकारात्मक बाजू अशी की, पराभवानंतरही त्यांनी कडवी झुंज दिली. दिल्लीचा कर्णधार ड्युमिनी याने सहा सामन्यांत दोन अर्धशतकांसह २०७ धावा केल्या, शिवाय सात गडी बाद केले. श्रेयस अय्यरने सहा सामन्यांत २२७ तसेच अँजेलो मॅथ्यूजने चांगले योगदान देत मध्य फळी मजबूत केली. युवराज, मयंक अग्रवाल आणि मनोज तिवारी हे मात्र चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले. गोलंदाजीत अमित मिश्रा आणि इम्रान ताहिर यांचा उत्तम पर्याय संघाकडे आहे.
बंगळुरूची फलंदाजीतील भिस्त कोहली, गेल आणि डिव्हिलियर्स यांच्यावर असेल. पण फलंदाजीतील कामगिरी लयबद्ध नसल्याने त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. यातून बोध घेऊन पुढील डावपेच आखावे लागणार आहेत. कोटला हे गेलचे आवडते मैदान आहे. याच मैदानावर त्याने २०१२ मध्ये नाबाद १२८ धावा ठोकल्या होत्या. कोहलीचे हे घरचे मैदान असल्याने स्थानिक प्रेक्षकांचा पाठिंबा त्याला मिळेल. (वृत्तसंस्था)
रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू
विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, दिनेश कार्तिक,
एस. बद्रीनाथ, डेरेन सॅमी, मिशेल स्टार्क, निक मेडिनसन, वरुण आरोन,
यजुवेंद्र चहल, रिली रोसोयू, विजय झोल, योगेश ताकवले, अबु नेचिम
अहमद, हर्षल पटेल, अशोक डिंडा, संदीप वॉरियर, मानविंदर बिस्ला, इक्बाल अब्दुल्ला, सीन एबोट, अॅडम मिल्ने, डेव्हिड व्हीसे, जलज सक्सेना, सर्फराज खान, शिशिर बावने.
दिल्ली डेअरडेव्हिल्स : जेपी ड्युमिनी (कर्णधार), मोहंमद शमी, क्विंटन डी कॉक, मनोज तिवारी, केदार जाधव, मयंक अगरवाल, शाहबाझ नदीम, सौरभ तिवारी, जयंत यादव, इम्रान ताहीर, नॅथन कूल्थर-नाइल, अँजेलो मॅथ्यूज, युवराजसिंग, अमित मिश्रा, जयदेव उनाडकट, गुरिंदर संधू, श्रेयश अय्यर, सीएम गौतम, ट्रावीस हेड, श्रीकर भरत, अॅल्बी मॉर्केल, मार्कस स्टॉल्नल्स, झहीर खान, केके ज्लाअस आणि डॉमनिक जोसेफ.