दारुण पराभव... सावध होण्याची गरज
By Admin | Updated: February 26, 2017 04:07 IST2017-02-26T04:07:25+5:302017-02-26T04:07:25+5:30
खेळामध्ये शब्द आणि आकड्यांना विशेष महत्त्व असते, असे माझे मत आहे; पण पुण्यात भारतीय संघाचा पराभव बघितल्यानंतर शब्द दुय्यम ठरतात.

दारुण पराभव... सावध होण्याची गरज
- हर्षा भोगले लिहितो़...
खेळामध्ये शब्द आणि आकड्यांना विशेष महत्त्व असते, असे माझे मत आहे; पण पुण्यात भारतीय संघाचा पराभव बघितल्यानंतर शब्द दुय्यम ठरतात. यजमान संघाला सहायक ठरेल अशा खेळपट्टीवर भारतीय संघ ७४ षटकांमध्ये दोनदा बाद झाला. याचा अर्थ, एका दिवसात भारतीय संघ दोनदा बाद झाल्यानंतरही एक तासाचा वेळ वाचला असता. त्यामुळे हा दारुण पराभव आहे.
याच खेळपट्टीवर आॅस्ट्रेलिया संघाने १८२ षटके फलंदाजी केली, तीही सर्वश्रेष्ठ गणल्या जाणाऱ्या माऱ्याविरुद्ध. आॅस्ट्रेलियाने परिस्थितीसोबत लवकर जुळवून घेतले, असे सहजपणे म्हणता येईल. पण, त्यांनी लढवय्या वृत्ती दाखविली, हे विसरता येणार नाही. आॅस्ट्रेलियाने भारतावर निर्विवाद वर्चस्व गाजवले. एखाद्या बॉक्सरने आव्हान दिल्यानंतर त्याचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आल्याप्रमाणे हे आहे.
विजयी घोडदौड सुरू असताना तुम्ही अनुकूल निकाल गृहीत धरता. खात्री आणि गृहीत धरणे यामध्ये फार थोडा फरक आहे. अभिमान आहे की घमेंड, हे ओळखणे आवश्यक आहे. प्रदीर्घ काळ जर तुमच्या मनाप्रमाणे घडत असेल, तर पुढे तुम्ही गृहीत धरण्यास सुरुवात करता; पण एखाद्या वेळेस पत्करावा लागलेला पराभव तुम्हाला पुन्हा हवेतून जमिनीवर आणण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आॅस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव कदाचित भारतीय संघाला जमिनीवर आणण्यासाठी पुरेसा ठरेल. त्यामुळे कधीकधी पत्करावा लागणारा हा पराभव काही वाईट बाब नाही. माझ्या अनुभवानुसार भारतीय संघाला जागे करणारा हा पराभव आहे. भारतीय संघ पलटवार करेल, याची आॅस्ट्रेलियालाही चांगली कल्पना आहे. गिलख्रिस्टने आॅस्ट्रेलिया संघाला ‘विजयाचा आनंद साजरा करा; पण दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा जोरादार सरावाला सुरुवात करा,’ असा सल्ला दिला आहे. ओकिफीच्या मनात काय घोळत असेल, याची कल्पना करा. वयाची तिशी गाठण्यापूर्वी विशेष संधी मिळाली नाही. श्रीलंका दौऱ्यात दुखापतग्रस्त झाला आणि आता अचानक हे घवघवीत यश मिळविले. हे दोन दिवस पुन्हा त्याच्या कारकिर्दीत येणार नाहीत; पण त्या दोन दिवसांनी त्याला क्रीडा वर्तुळात मानाचे स्थान मिळवून दिले. क्रिकेट या खेळाची ही विशेषता आहे. स्टीव्ह स्मिथने कर्णधाराला साजेशी खेळी केली. आव्हान असले म्हणजे चॅम्पियनला आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी असते. भारतीय संघ दमदार पुनरागमन करेल, असा मला विश्वास आहे आणि आॅस्ट्रेलियाला त्याची पूर्ण कल्पना आहे. (पीएमजी)