दिल्लीचा हैदराबादला दणका

By Admin | Updated: May 13, 2016 03:27 IST2016-05-13T03:27:54+5:302016-05-13T03:27:54+5:30

अडखळत्या सुरुवातीनंतर सॅमसन आणि पंत यांनी मोक्याच्या वेळी केलेल्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर दिल्लीने सध्या फॉर्ममध्ये असलेल्या हैदराबादचा ७ विकेटने दणदणीत पराभव केला.

Dahan of Delhi's Hyderabad | दिल्लीचा हैदराबादला दणका

दिल्लीचा हैदराबादला दणका

हैदराबाद : अडखळत्या सुरुवातीनंतर संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांनी मोक्याच्या वेळी केलेल्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने सध्या फॉर्ममध्ये असलेल्या सनरायझर्स हैदराबादचा ७ विकेटने दणदणीत पराभव केला. हैदराबादने दिलेल्या १४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकरांनी १८.१ षटकांतच ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १५० धावा केल्या.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीकरांनी यजमान हैदराबादला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. दिल्लीच्या अचूक माऱ्यापुढे हैदराबादला समाधानकारक मजल मारता आली. धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात अडखळती झाली. मयांक अगरवाल (१०) झटपट बाद झाल्यानंतर क्विंटन डी कॉक व करुण नायर यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. दोघेही दहाव्या षटकात अनुक्रमे दुसऱ्या व पाचव्या चेंडूवर बाद झाल्याने दिल्लीचा डाव ३ बाद ७८ धावा असा घसरला. नायरने १७ चेंडंूत २०, तर डी कॉकने ३१ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४४ धावा फटकावल्या.
हैदराबाद वर्चस्व मिळवणार असे दिसत होते. परंतु, संजू व ऋषभ यांनी दमदार फटकेबाजी करत दिल्लीला शानदार विजय मिळवून दिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद ७२ धावांची विजयी भागीदारी केली. संजूने २६ चेंडूंत २ षटकारांसह नाबाद ३४ धावा केल्या. तर ऋषभने २६ चेंडंूत २ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ३९ धावा चोपल्या.
तत्पूर्वी, आक्रमक फलंदाज व कर्णधार डेव्हिड वॉर्नरने केलेल्या वेगवान फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने निर्धारित षटकात ८ बाद १४६ धावांची समाधानकारक मजल मारली. वॉर्नरने ३० चेंडंूत ६ चौकार व एका षटकारासह ४६ धावा काढल्या, तर शिखर धवन (३४) व केन विलियम्सन (२७) यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
> सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ८ बाद १४६ धावा (डेव्हिड वॉर्नर ४६, शिखर धवन ३४, केन विलियम्सन २७; अमित मिश्रा २/१९, नॅथन कुल्टर-नाईल २/२५) पराभूत वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स : १८.१ षटकांत ३ बाद १५० धावा (क्विंटन डी कॉक ४४, ऋषभ पंत नाबाद ३९, संजू सॅमसन नाबाद ३४; मोइसेस हेन्रीकेस २/१९)

Web Title: Dahan of Delhi's Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.