द.आफ्रिका उपांत्यपूर्व फेरीत
By Admin | Updated: March 13, 2015 00:56 IST2015-03-13T00:56:32+5:302015-03-13T00:56:32+5:30
कर्णधार एबी डिव्हिलियर्सच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर द. आफ्रिकेने संयुक्त अरब अमिरात (यूएई) संघाचा गुरुवारी १४६ धावांनी पराभव करून विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

द.आफ्रिका उपांत्यपूर्व फेरीत
वेलिंग्टन : कर्णधार एबी डिव्हिलियर्सच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर द. आफ्रिकेने संयुक्त अरब अमिरात (यूएई) संघाचा गुरुवारी १४६ धावांनी पराभव करून विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
संघासाठी आपण किती महत्त्वपूर्ण खेळाडू आहोत, हे डिव्हिलियर्सने आज पुन्हा सिद्ध केले. त्याने ९९ धावा ठोकल्या; शिवाय दोन गडीही बाद केले. त्याच्याशिवाय बेहारडिनने अखेरच्या क्षणी ३१ चेंडू टोलवून नाबाद ६४ धावा फटकावताच मंदगतीने सुरुवात करणाऱ्या द. आफ्रिकेने ६ बाद ३४१ धावा उभारल्या. स्पर्धेत सर्वच सामने गमावणाऱ्या यूएईने विजयी लक्ष्य गाठण्याचा प्रयत्नही केला नाही. ४७.३ षटकांत १९५ धावांत त्यांचा डाव आटोपला. स्वप्निल पाटील याने सर्वाधिक नाबाद ५७ धावा केल्या; पण त्यासाठी तो शंभर चेंडू खेळला. भारत आणि पाककडून पराभूत झालेल्या आफ्रिकेने यूएईवर चमकदार विजयासह ६ सामन्यांत ८ गुणांची कमाई करून भारतापाठोपाठ दुसऱ्या स्थानासह साखळीची सांगता केली. यूएईचा हा सलग पाचवा पराभव होता. रविवारी त्यांची गाठ पडेल ती विंडीजशी.
डिव्हिलियर्सचे शतक एका धावेने हुकल्यानंतरही तो हसत-हसत पॅव्हेलियनमध्ये परतला. ८३ चेंडूंच्या त्याच्या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. अर्थात, सामन्याचा मानकरी तोच ठरला. सातव्या स्थानावर आलेल्या बेहारडिनने ५ चौकार आणि ३ षटकारांचा झंझावात केला. यूएईने बचावात्मक पवित्रा घेतल्याने त्यांना विजयासाठी प्रयत्न करताच आले नाहीत. १३व्या षटकापर्यंत ४५ धावांत ३ गडी गमावणाऱ्या या संघाने स्वप्निल पाटीलच्या बळावर काहीसा प्रतिकार केला खरा; पण तीदेखील औपचारिकताच ठरली. अन्वरने ३९ आणि नावीदने १७ धावा केल्या. डिव्हिलियर्सने १५ धावांत त्यांचे २ गडी टिपले. फिलांडरनेदेखील २ गडी बाद केले. त्याआधी हाशिम आमला १२ आणि डिकॉक २६ यांनी अडखळत सुरुवात केली; पण रोसो (४३) आणि डिव्हिलियर्स यांनी आफ्रिकेचा डाव सावरला. मिलरने (४९) डिव्हिलियर्ससोबत चौथ्या गड्यासाठी १०८ धावांची भागीदारी केली. ड्युमिनीने २३ धावा केल्या, तर फिलांडर १० धावा काढून नाबाद राहिला. (वृत्तसंस्था)