सिरिल वर्माचे ‘चंदेरी’ यश
By Admin | Updated: November 17, 2015 03:09 IST2015-11-17T03:09:27+5:302015-11-17T03:09:27+5:30
भारताचा युवा बॅडमिंटनपटू सिरिल वर्मा याने चमकदार खेळाचे प्रदर्शन करताना वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात

सिरिल वर्माचे ‘चंदेरी’ यश
लीमा (पेरु) : भारताचा युवा बॅडमिंटनपटू सिरिल वर्मा याने चमकदार खेळाचे प्रदर्शन करताना वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात सिरिलला चिनी तैपईच्या चिया हुंग ल्यूविरुद्ध १-२ असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
५० मिनिटांच्या तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात सिरिलने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना विजेतेपदासाठी ल्यूला चांगलेच झुंजवले. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड
खेळ करताना सामना चांगलाच रंगतदार केला. या वेळी सिरिलने अंतिम क्षणी खेळ उंचावताना
२१-१७ अशी बाजी मारत
सामन्यात १-० अशी आश्वासक सुरुवात केली.
मात्र यानंतर ल्यूने केवळ पुनरागमनच केले नाही, तर एकहाती वर्चस्व राखताना सिरिलला पुन्हा डोके वर काढण्याची एकही संधी दिली नाही. या वेळी ल्यूने धडाकेबाज
खेळ करताना सलग दोन सेटमध्ये सहज बाजी मारून १७-२१, २१-१०, २१-७ अशा विजयासह सुवर्णपदक निश्चित केले. १५ वर्षीय सिरिल पुल्लेला गोपीचंद अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. (वृत्तसंस्था)
याआधी गतमहिन्यात सिरिलला दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सहभागी होता आले नव्हते. तरीही निराश न होता त्याने स्वत:ला सिद्ध केले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) आदेशानुसार त्याला वय पडताळणी चाचणीला सामोरे जावे लागले होते. या वेळी राम मनोहर लोहियाच्या डॉक्टरांनी सिरिलचे वय अधिक असल्याचे घोषित केल्याने त्याला आशियाई ज्युनियर अंडर १७ व अंडर १५ या स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. मात्र नंतर एम्सच्या डॉक्टरांनी सिरिलच्या वयाबाबतीत योग्य निर्णय दिला.
भारतीय बॅडमिंटनचा उगवता तारा
वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप रौप्यपदकासह सिरिल देशातील अव्वल बॅडमिंटनपटूंच्या पंक्तीत बसला. याआधी या स्पर्धेत फुलराणी सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, आरएमव्ही गुरुसाईदत्त, एचएस प्रणय आणि समीर वर्मा यांच्यासारख्या अव्वल राष्ट्रीय खेळाडूंनी पदक पटकावले आहे. त्यामुळे सिरिलकडे भारतीय बॅडमिंटनमधील उगवता तारा म्हणून पाहण्यात येत आहे.
सिरिलने या स्पर्धेत नील वेन्सत्रा (नेदरलँड), थॉमस बारेस (फ्रान्स), कंताफोन वांगचारोन (थायलंड), अँडर्स अँटोसन (डेन्मार्क), सतीशरथन आर. (मलेशिया) आणि अदुलराच नामकुल (थायलंड) या खेळाडूंना नमवून अंतिम फेरीत धडक मारली होती.