आयर्लंडला बाद फेरीत बघण्यास उत्सुक
By Admin | Updated: March 13, 2015 00:55 IST2015-03-13T00:55:30+5:302015-03-13T00:55:30+5:30
विश्वकप स्पर्धेत पाकिस्तानला साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात आयर्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. आयर्लंड ‘जायंट किलर’

आयर्लंडला बाद फेरीत बघण्यास उत्सुक
विश्वकप स्पर्धेत पाकिस्तानला साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात आयर्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. आयर्लंड ‘जायंट किलर’ म्हणून ओळखला जात असल्यामुळे ही लढत महत्त्वाची आहे. यापूर्वी आयर्लंड संघाने इंग्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज या संघांविरुद्ध अशी कामगिरी केलेली आहे. पाकिस्तान संघ गटात दुसरे किंवा तिसरे स्थान पटकावण्यास उत्सुक आहे. पाकिस्तानने दुसरे स्थान पटकावण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यामुळे त्यांना उपांत्यपूर्व फेरीत श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. पण, अशा प्रकारच्या बाबीवर आपले नियंत्रण नसते. पाकिस्तानने आयर्लंडविरुद्धच्या लढतीचा उपयोग उमर अकमल व सोहेब मकसूद यांच्यासारख्या फलंदाजांना अधिक संधी देण्यासाठी करायला हवा. पाकिस्तानचा विचार करता, हे दोन्ही युवा खेळाडू विशेषत: उपांत्यपूर्व फेरीत अधिक महत्त्वाचे ठरणार आहेत. वेस्ट इंडीजमध्ये २००७मध्ये झालेल्या विश्वकप स्पर्धेत पाकिस्तानला आयर्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. पण, त्या वेळी खेळपट्ट्या या स्पर्धेच्या तुलनेत चांगल्या नव्हत्या. आता सर्व काही बाद फेरीमध्ये कशी कामगिरी होते, यावर अवलंबून राहील. आकडेवारीचा विचार करता, पाकिस्तान संघाला आयर्लंडविरुद्ध अधिक अडचण भासेल, असे वाटत नाही. पण, त्यासाठी फलंदाजांना सकारात्मक खेळ करावा लागेल. चेंडू जर फटका मारण्यालायक आहे, तर त्यावर धावा वसूल करायलाच हव्यात. पाकिस्तानच्या फलंदाजांकडून लौकिकाला साजेशी कामगिरी अपेक्षित आहे. वेस्ट इंडीज संघाला अखेरच्या साखळी सामन्यात यूएईच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या लढतीत वेस्ट इंडीज संघ २ गुण वसूल करण्यात यशस्वी ठरेल; पण आयर्लंड संघाला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविताना बघण्यास मी उत्सुक आहे, कारण क्रिकेटसाठी ही चांगली बाब असेल. विंडीज संघात सांघिक कामगिरीचा अभाव असल्याचे दिसून येते. उपांत्यपूर्व फेरीपूर्वी भारतीय संघाला अखेरच्या साखळी सामना झिम्बाब्वेविरुद्ध खेळावा लागेल. फलंदाज चांगल्या फॉर्मात असून, गोलंदाजांनाही लय गवसली आहे. भारतीय संघ कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरेल, असा मला विश्वास आहे. झिम्बाब्वेसाठी परिस्थिती कठीण राहणार आहे. कारण, त्यांना वर्ल्ड चॅम्पियन संघाविरुद्ध खेळायचे आहे. भारतीय संघाची कामगिरी वर्ल्ड चॅम्पियनप्रमाणे आहे. अशा परिस्थितीत झिम्बाब्वेने केवळ खेळाचा आनंद घ्यायला हवा. (टीसीएम)