उत्सुकता भारताच्या विजयाची

By Admin | Updated: October 14, 2015 00:12 IST2015-10-14T00:12:44+5:302015-10-14T00:12:44+5:30

कारकिर्दीतील सर्वांत खडतर कालखंडातून वाटचाल करीत असलेला कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि सलग पराभव स्वीकारणारा भारतीय संघ बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध

Curiosity for India's victory | उत्सुकता भारताच्या विजयाची

उत्सुकता भारताच्या विजयाची

इंदूर : कारकिर्दीतील सर्वांत खडतर कालखंडातून वाटचाल करीत असलेला कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि सलग पराभव स्वीकारणारा भारतीय संघ बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वन-डे सामन्यात विजयी मार्गावर परतण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरणार आहे.
दक्षिण आफ्रिका संघाच्या सुरू असलेल्या दौऱ्यात यजमान भारतीय संघाला अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही. दोन टी-२० सामने गमावणाऱ्या भारतीय संघाला कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वन-डे लढतीतही पराभवाला सामोरे जावे लागले.
टीकाकारांचे लक्ष्य ठरलेल्या धोनीसाठी सध्याची स्थिती आव्हानात्मक आहे. विश्वकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पराभवापासून धोनीसाठी यंदाचे वर्ष विशेष चांगले गेलेले नाही.
आयपीएलच्या अंतिम लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर बांगलादेशमध्ये वन-डे मालिका आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध टी-२० मालिकाही गमावल्यामुळे धोनीच्या सुवर्णमय कारकिर्दीमध्ये काळ्या अध्यायाची नोंद झाली. फलंदाज म्हणूनही तो ‘मॅच फिनिशर’ची भूमिका बजावण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.
पहिल्या वन-डे लढतीत त्याच्याकडे छाप सोडण्याची चांगली संधी होती, पण मोक्याच्या क्षणी त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. भारताला अखेरच्या षटकात विजयासाठी ११ धावांची गरज होती, पण ‘कॅप्टन कुल’ संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. त्याने ३० चेंडूंना सामोेरे जाताना ३१ धावा फटकावल्या. त्यात केवळ एका चौकाराचा समावेश आहे.
टी-२० विश्वकप स्पर्धेला अधिक कालावधी उरलेला नाही. त्यामुळे धोनीकडे अधिक वेळ नाही. बुधवारच्या लढतीत सर्वांची नजर धोनी व त्याच्या नेतृत्वावर राहणार आहे.
भारताची फलंदाजीची बाजू मजबूत आहे. सलामीवीर रोहित शर्मा फॉर्मात आहे. रोहितने धर्मशालामध्ये शतकी खेळी केल्यानंतर कानपूरमध्ये दीड शतकी खेळी केली होती. रोहितचा सलामीचा सहकारी शिखर धवनचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. शिखर मोठी खेळी करण्यास उत्सुक आहे. संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेने कानपूरमध्ये ६० धावांची खेळी केली. रहाणे कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. विराट कोहलीवरही मोठी खेळी करण्याचे दडपण राहील. सुरेश रैना आणि स्टुअर्ट बिन्नी यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजांचे अपयश धोनीसाठी सर्वांत मोठा चिंतेचा विषय आहे. फॉर्मात असलेला एकमेव गोलंदाज आर. अश्विन दुखापतग्रस्त असल्यामुळे संघात नाही. भुवनेश्वर कुमार व उमेश यादव या वेगवान गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवता आलेले नाही. एबी डिव्हिलियर्सने कानपूरमध्ये संघाला ३००चा पल्ला ओलांडून दिला. डिव्हिलियर्सने ७३ चेंडूंना सामोरे जाताना १०४ धावांची खेळी केली. भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या १० षटकांत १०० पेक्षा अधिक धावा बहाल केल्या. अश्विन व लेग स्पिनर अमित मिश्रा यांनी चांगली कामगिरी केली. अश्विनच्या स्थानी संघात अनुभवी फिरकीपटू हरभजनची निवड करण्यात आली आहे.
दुसऱ्या बाजूचा विचार करताना दक्षिण आफ्रिका संघ भारतात पहिली वन-डे मालिका जिंकण्यास प्रयत्नशील आहे. मोर्नी मोर्कल व डेल स्टेन यांच्या समावेशामुळे त्यांची गोलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. युवा कागिसो रबादाने टी-२० मालिकेत छाप सोडली असून, कानपूरमध्ये अखेरच्या षटकात अचूक मारा करीत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. लेग स्पिनर इम्रान ताहिरने लौकिकाला साजेशी कामगिरी केली. फलंदाजीचे नेतृत्व डिव्हिलियर्स करीत असून, फाफ डू प्लेसिस फॉर्मात आहेत. जेपी ड्युमिनीने टी-२० मध्ये चमकदार कामगिरी केली. याव्यतिरिक्त हाशिम अमला, डेव्हिड मिलर, क्विंटन डिकाक, फरहान बेहारदिन यांच्याकडूनही संघाला चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. भारताने यापूर्वी या मैदानावर खेळल्या गेलेल्या तिन्ही सामन्यांत विजय मिळवलेला आहे. (वृत्तसंस्था)
>>>>>>> सामन्याची वेळ : दु. १.३० पासून
>>> रोहितला पहिल्या १० चेंडूंत बाद करा : लँगवेल्ट
रोहितच्या आक्रमक क्षमतेची कल्पना असलेले दक्षिण आफ्रिका संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक चार्ल्स लँगवेल्ट त्याला रोखण्यासाठी योजना आखण्यात व्यस्त आहेत.
दक्षिण आफ्रिका संघ सध्याच्या भारत दौऱ्यात अद्याप अपराजित असला तरी भारतीय फलंदाज रोहित शर्माचा फॉर्म त्यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. बुधवारी खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वन-डे लढतीत रोहितला १० चेंडूंमध्ये बाद करण्यास दक्षिण आफ्रिका संघ प्रयत्नशील असून, त्यासाठी त्यांनी रणनीती आखली आहे.
होळकर स्टेडियममध्ये बुधवारी खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वन-डे लढतीच्या पूर्वसंध्येला बोलताना लँगवेल्ट म्हणाला, ‘रोहित सध्या चांगल्या फॉर्मात आहे. तो भारतीय वातावरणात चांगला खेळतो. त्याला सुरुवातीला करण्यात येणारे १० चेंडू अधिक महत्त्वाचे आहेत. त्याला सुरुवातीच्या १० चेंडूंमध्ये बाद करण्याचा प्रयत्न राहील. २० धावा फटकावल्यानंतर शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहितचा समावेश आहे.’
>>>>>>> प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), हरभजन सिंग, स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायडू, मोहित शर्मा, रोहित शर्मा, उमेश यादव, गुरकिरत सिंग आणि अमित मिश्रा.
दक्षिण आफ्रिका : एबी डिव्हिलियर्स (कर्णधार), हाशिम अमला, क्विंटन डिकाक, फाफ डू प्लेसिस, जेपी ड्युमिनी, डेव्हिड मिलर, फरहान बेहारदिन, ख्रिस मॉरिस, खाया जोंडो, अ‍ॅरोन फांगिसो, इम्रान ताहिर, डेल स्टेन, मोर्नी मोर्कल, केली एबोट, कागिसो रबादा.

Web Title: Curiosity for India's victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.