क्रिकेटचा समृध्द इतिहास काळाच्या पडद्याआड

By Admin | Updated: May 24, 2014 04:47 IST2014-05-24T04:47:31+5:302014-05-24T04:47:31+5:30

क्रिकेट प्रशासनाचा प्रगाढ अनुभव असलेले भारताचे माजी कसोटीपटू माधव मंत्री हे आज (शुक्रवारी) सकाळी काळाच्या पडद्याआड गेले.

Cricket's rich history is behind the scenes of the times | क्रिकेटचा समृध्द इतिहास काळाच्या पडद्याआड

क्रिकेटचा समृध्द इतिहास काळाच्या पडद्याआड

विनय नायडू, मुंबई -  क्रिकेट प्रशासनाचा प्रगाढ अनुभव असलेले भारताचे माजी कसोटीपटू माधव मंत्री हे आज (शुक्रवारी) सकाळी काळाच्या पडद्याआड गेले. एक मे रोजी त्यांना हृदयविकाराचा छोटा झटका आला होता, तेव्हापासून त्यांच्यावर एका खासगी दवाखान्यात उपचार सुरु होते. पण शुक्रवारी त्यांना मृत्यूने गाठलेच. ९२ व्या वर्षी जग सोडणार्‍या मंत्री यांनी क्रिकेटचा समृध्द वारसा मागे सोडला आहे. नात्याने लिटल मास्टर सुनील गावस्कर यांचे मामा असलेले मंत्री १९५0 मध्ये भारताकडून चार कसोटी सामने खेळले आहेत. सलामीवीर फलंदाजा आणि यष्टीरक्षक म्हणून कामगिरी बजावणार्‍या मंत्री यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये दोन दशके गाजविली आहेत. रणजी स्पर्धेत त्यांनी ५३.१४च्या सरासरीने २९७६ धावा केल्या आहेत. यष्टीमागे देदिप्यमान कामगिरी करताना त्यांनी ६९ झेल टिपले असून २३ खेळाडूंना यष्टीचित केले आहे. त्यांनी कारकिर्दीत ७ शतके झळकाविली आहेत. मैदानावरील कामगिरी बरोबरच प्रशासकिय कामातही त्यांनी छाप सोडली आहे. १९६४ ते ६८ या काळात त्यांनी राष्ट्रीय निवड समितीत काम केले. १९९0 ते ९२ काळात बीसीसीआयचे खजीनदार होते. १९८८-९0 मध्ये त्यांनी मुंबई क्रिकेट असो.चे अध्यक्षपद सांभाळले. नाशिक येथे जन्मलेले मंत्री कडक शिस्तिचे भोक्ते होेते. ते अलिकडील काही दिवस वगळता प्रकृतीने अगदी ठणठणीत होते. वानखेडे स्टेडीयमच्या पायर्‍या ते न थकता चढत असत. क्रिकेटबद्दल त्यांना प्रचंड ज्ञान होते. सुनील गावसकर, अजित वाडेकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि मंत्री हे दोघेही एकाच लोकलने कामावर जायचे. त्यातून त्यांचे चांगले सूर जुळले होते. मंत्री हे एसीसी कंपनीत तर ठाकरे फ्रीप्रेस जर्नलला जात असत. मंत्री हे दादर युनियनचे प्रतिनिधीत्व करीत असत. मुंबईत त्याकाळी क्लब क्रिकेटमध्ये प्रचंड स्पर्धा असायची. त्यांना सिक्सरकिंंग म्हणून ओळखले जायचे. पुढे येवून षटकार ठोकणे ही त्यांची खासियत. चंदेरी लेसचे पांढरे चकचकीत शूज घातलेल्या मंत्री यांनी ‘स्टेपआउट’ केले की समजायचे षटकार बसलाच. यष्टीमागे त्यांची चपळता विजेलाही लाजवणारी होती. दादर युनियनकडून खेळणार्‍या सुभाष गुप्तेचे अफलातून वळणारे चेंडू ते सहजतेने ‘कलेक्ट’ करायचे.

Web Title: Cricket's rich history is behind the scenes of the times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.