ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. २७ - एका तरूणीला मारहाण केल्याप्रकरणी भारताचा फिरकीपटू अमित मिश्राला पोलिसांनी अटक केली असून त्याी जामिनावर सुटकाही करण्यात आली आहे. अमितने आपल्याला मारहाण केल्याची तक्रार तरूणीने गेल्या आठवड्यात नोंदवली होती, त्यानंतर बेंगळुरू पोलिसांनी मिश्राला आठवडाभरात चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती, अखेर आज त्याला अटक करण्यात आली.
बेंगळुरुत राहणा-या एका तरुणीची गेल्या ४ ते ५ वर्षांपासून अमित मिश्राशी ओळख असून ते दोघेही सातत्याने भेटत होते. क्रिकेट कॅम्पसाठी बेंगळुरुत आलेल्या मिश्राला भेटण्यासाठी संबंधीत तरुणी २५ सप्टेंबर रोजी त्याच्या हॉटेलमध्ये गेली होती. ती त्याच्या रूममध्ये गेली तेव्हा मिश्रा तेथे उपस्थित नव्हता मात्र तो परत आल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि त्याने तरूणीला मारहाण केली. या घटनेनंतर पिडीत तरुणीने बेंगळुरु पोलिसांकडे अमित मिश्रा विरोधात मारहाण व विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणात अमित मिश्राला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीसही बजावली होती.