क्रिकेट पंढरीतच उडाला धुव्वा
By Admin | Updated: October 26, 2015 00:02 IST2015-10-26T00:02:16+5:302015-10-26T00:02:16+5:30
दक्षिण आफ्रिकन फलंदाजीचा तुफानी हल्ला, गोलंदाजांची सुमार कामगिरी आणि दबावाखाली कोलमडलेली फलंदाजी यामुळे निर्णायक सामन्यात टीम इंडियाला तब्बल २१४ धावांनी मानहानिकारक पराभवास सामोरे जावे लागले.

क्रिकेट पंढरीतच उडाला धुव्वा
रोहित नाईक, मुंबई
दक्षिण आफ्रिकन फलंदाजीचा तुफानी हल्ला, गोलंदाजांची सुमार कामगिरी आणि दबावाखाली कोलमडलेली फलंदाजी यामुळे निर्णायक सामन्यात टीम इंडियाला तब्बल २१४ धावांनी मानहानिकारक पराभवास सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे हा पराभव भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईत झाल्याने भारतीयांच्या जखमेवर द. आफ्रिकेने मीठ चोळले. यासह पाच सामन्यांच्या मालिकेवर द. आफ्रिकेने ३-२ असा कब्जा केला.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली खरी, मात्र सर्वच क्षेत्रात ढेपाळलेल्या कागदी वाघांनी त्यांची घोर निराशा केली. द. आफ्रिकेने दिलेल्या ४३९ धावांच्या महाकाय लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव ३६ षटकांत २२४ धावांत संपुष्टात आला. भारताकडून सलामीवीर शिखर धवन आणि भरवशाच्या अजिंक्य रहाणे यांनीच अर्धशतकी खेळी करून थोडाफार प्रतिकार केला. इतर फलंदाज मात्र दबावाला बळी पडले. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे स्वस्तात बाद झाल्यानंतर धवन - रहाणे यांनी ११२ धावांची भागीदारी करून भारताच्या थोड्याफार आशा जिवंत ठेवल्या. धवन आणि रहाणे चांगल्या स्थितीत असताना बाद झाल्याने भारताच्या आव्हानातली हवा निघाली. धवनने ६० धावा काढल्या. तर रहाणेने आक्रमक फलंदाजी करताना ५८ चेंडूत ९ चौकार व ३ षटकारांसह ८७ धावांची अपयशी झुंज दिली. युवा कागिसो रबाडाने ४ व अनुभवी डेल स्टेनने ३ बळी घेत टीम इंडियाची दाणादाण उडवली.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत आक्रमक सुरुवात केली. संपूर्ण मालिकेत अपयशी ठरलेल्या हाशिम आमलाने जबरदस्त सुरुवात करताना १३ चेंडूत ५ चौकार मारुन २३ धावा काढल्या. मोहित शर्माने त्याचा अडसर दूर केला. या वेळी भारत वर्चस्व मिळवणार असे दिसत होते. मात्र येथूनच क्विंटन डीकॉक व फाफ डू प्लेसिस यांनी भारतीयांना दमवले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १५४ धावांची भागीदारी करून भारतीय गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवले. डीकॉकने ७८ चेंडूतच शतक झळकावले. शतक झळकावल्यानंतर डीकॉक आणखी आक्रमक झाला. ८७ चेंडूत १७ चौकार व १ षटकार खेचून तो रैनाच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र यानंतर आगीतून फुफाट्यात सापडावे अशी भारतीय गोलंदाजांची अवस्था झाली.
आक्रमण काय असते याचे धडे देताना प्लेसिसने कर्णधार एबी डिव्हीलियर्ससह १६४ धावांची भागीदारी केली. भारताच्या सुमार क्षेत्ररक्षणाचाही फायदा आफ्रिकेला झाला. गोलंदाजांनीही आपल्या चुकांची पुनरावृत्ती करून आफ्रिकेला धावांचा बोनस दिला. प्लेसिसने १०५ चेंडूंत शतक झळकावल्यानंतर तुफानी हल्ला चढवला. क्रॅम्प आल्यानंतरही त्याने आपला दांडपट्टा चालूच ठेवला होता. अखेर ११५ चेंडूत ९ चौकार व ६ षटकार ठोकून तो निवृत्त झाला. मात्र तरीही भारतीयांची परीक्षा संपली नव्हती. कारण धडाकेबाज फलंदाजीचा बादशाह डिव्हीलियर्स दुसऱ्या बाजूने ठोकून काढत होता.
कशीही गोलंदाजी करा, कुठेही चेंडू टाका आम्ही तुम्हाला टोलावणारच अशा पवित्र्यामध्ये आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चोपण्यास सुरुवात केली. एबीचा धडाका इतका जबरदस्त होता की, प्रेक्षकांनीही ‘‘एबी... एबी..’’ जयघोष सुरु केला. त्याने केवळ ६१ चेंडूत ३ चौकार आणि तब्बल ११ षटकारांचा पाऊस पाडताना ११९ धावा कुटल्या. भुवनेश्वर कुमारने ४७ व्या षटकात एबीला बाद केले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला. यानंतर डेव्हीड
मिल्लर, फरहान बेहरादीन आणि डीन एल्गर यांनी संघाला ४००चा टप्पा पार करून दिला.
........धावफलक :
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डीकॉक झे. कोहली गो. रैना १०९, हाशिम आमला झे. धोनी गो. मोहित शर्मा २३, फाफ डू प्लेसिस निवृत्त १३३, एबी डिव्हीलियर्स झे. धोनी गो. भुवनेश्वर ११९, डेव्हीड मिल्लर नाबाद २२, फरहान बेहरादीन झे. रैना गो. हरभजन सिंग १६, डीन एल्गर नाबाद ५. अवांतर - ११. एकूण : ५० षटकांत ४ बाद ४३८ धावा. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १०-०-१०६-१; मोहित शर्मा ७-०-८४-१; हरभजन सिंग १०-०-७०-१; अक्षर पटेल ८-०-६५-०; अमित मिश्रा १०-०-७८-०; सुरेश रैना ३-०-१९-१; विराट कोहली २-०-१४-०.
भारत : रोहित शर्मा झे. इम्रान ताहीर गो. एबॉट १६, शिखर धवन झे. आमला गो. रबाडा ६०, विराट कोहली झे. डीकॉक गो. रबाडा ७, अजिंक्य रहाणे झे. बेहरादीन गो. स्टेन 87, सुरेश रैना त्रि. गो. रबाडा १२, महेंद्रसिंग धोनी त्रि. गो. इम्रान ताहीर २७, अक्षर पटेल झे. मिल्लर गो. स्टेन ५, हरभजन सिंग झे. मॉरीस गो. स्टेन ०, भुवनेश्वर कुमार झे. मिल्लर गो. इम्रान ताहीर १, अमित मिश्रा पायचीत गो. रबाडा ४, मोहित शर्मा नाबाद ०. अवांतर - ५. एकूण - ३६ षटकांत सर्वबाद २२४ धावा. गोलंदाजी : डेल स्टेन ७-०-३८-३; कागिसो रबाडा ७-०-४१-४; काईल एबॉट ७-०-३९-१; फरहान बेहरादीन ८-०-५५-०; इम्रान ताहीर ७-१-५०-२.
>>‘झॅक’चा सत्कार...
नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खान याचा मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) सत्कार केला. कपिल देव यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून छाप पाडलेल्या या मुंबईकर खेळाडूने यावेळी मुंबई क्रिकेट आणि क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांच्य हस्ते झहीरला सम्मानित करण्यात आले.
> एकदिवसीय सामन्यात ४०० चा टप्पा पार करण्याची दक्षिण आफ्रिकेची सहावी वेळ एकदिवसीय सामन्याच्या एकाच डावात तीन फलंदाजांनी शतक झळकावण्याची कामगिरी क्रिकेट इतिहासात केवळ दुसऱ्यांदा. याआधीही अशीच कामगिरी आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध केली होती. दक्षिण आफ्रिकेच्या सर्वच फलंदाजांची धावगती (स्ट्राईक रेट) १०० च्या पुढे. १०६, ८४, ७०, ६५ आणि ७८ ही आकडेवारी फलंदाजांची नसून, भारताच्या प्रमुख सहा गोलंदाजांनी दिलेल्या धावा आहेत. यावरुनच भारतीय गोलंदाजांची उडालेली दाणादाण लक्षात येते. ४३८ ही वानखेडे स्टेडियमवरील सर्वोच्च धावसंख्या ठरली. याआधी विश्वचषक २०११ स्पर्धेत न्यूझीलंडने कॅनडाविरुद्ध येथे ३५८ धावा चोपल्या होत्या. आफ्रिकेने या सामन्यात २० षटकार ठोकले. सर्वाधिक षटकारांचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर असून, त्यांनी जानेवारी २०१४ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध २२ षटकार मारले आहेत. अखेरच्या १२ षटकांत आफ्रिकेने १५ षटकार आणि ८ चौकारांसह तब्बल १६९ धावा कुटल्या. हाशिम आमलाने या सामन्यात ६ हजार धावांचा पल्ला गाठला. त्याने ही कामगिरी १२३ डावांमध्ये केली असून, सर्वांत कमी डावांत ६ हजार धावा गाठणारा तो जगातील वेगवान फलंदाज ठरला.