...श्रेय फिरकीपटूंना मिळाले नाही

By Admin | Updated: December 2, 2015 04:09 IST2015-12-02T04:09:50+5:302015-12-02T04:09:50+5:30

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या मालिकेत भारतीय फिरकीपटूंनी ५० पैकी ४७ बळी घेतले असले, तरी लेग स्पिनर अमित मिश्रा मात्र निराश आहे. खेळपट्टीच्या स्वरूपावरून

... credentials were not received by the spinners | ...श्रेय फिरकीपटूंना मिळाले नाही

...श्रेय फिरकीपटूंना मिळाले नाही

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या मालिकेत भारतीय फिरकीपटूंनी ५० पैकी ४७ बळी घेतले असले, तरी लेग स्पिनर अमित मिश्रा मात्र निराश आहे. खेळपट्टीच्या स्वरूपावरून सुरू असलेल्या चर्चेमुळे रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा आणि मिश्रा यांची कामगिरी झाकोळली गेली.
आवश्यक ते श्रेय मिळाले का, याबाबत बोलताना मिश्रा म्हणाला, ‘‘खेळपट्टीबाबतच चर्वितचर्वण झाल्यामुळे आम्हाला आवश्यक ते श्रेय मिळाले नाही. श्रीलंकेतही आम्हाला फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या मिळाल्या. आम्ही तेथेही चांगली गोलंदाजी केली. फिरकीपटूंनी जर चांगली कामगिरी केली, तर किमान उल्लेखनीय कामगिरीसाठी तरी त्यांची प्रशंसा करायला हवी. फिरकीपटूंना केवळ या खेळपट्ट्यांमुळे विकेट मिळालेल्या नाहीत. आम्ही भारताबाहेरही चांगली कामगिरी केली आहे.’’ मिश्राच्या मते फिरकीपटूंविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचे तंत्र सदोष असल्यामुळे त्यांना नुकसान सोसावे लागले. आश्विन (२४ बळी) व जडेजा (१६ बळी) यांच्या तुलनेत दोन कसोटी सामन्यांत ७ बळी घेणारा मिश्रा म्हणाला, ‘‘उपखंडाबाहेर आम्हाला अधिक उसळी असलेल्या खेळपट्ट्यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे अन्य संघ ज्या वेळी भारतात येतात त्या वेळी त्यांना फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांच्या आव्हानाला समोरे जावे लागते. खेळपट्ट्यांसोबत जुळवून घेणे महत्त्वाचे ठरते. दक्षिण आफ्रिका संघाला गृहपाठ करणे आणि फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर फलंदाजी करताना तंत्रामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. दक्षिण आफ्रि केच्या फलंदाजांना आम्ही आक्रमक फलंदाजी करण्याची संधी दिली नाही. त्यामुळे ते दडपणाखाली आहेत.’’
मिश्रा पुढे म्हणाला, ‘‘गेल्या १५ वर्षांत मायदेशात आम्हाला अशा खेळपट्ट्या मिळालेल्या नाहीत. ज्या वेळी आम्ही विदेशात खेळायला जातो त्या वेळी तेथील खेळपट्ट्या यजमान संघासाठी अनुकूल असतात. आम्ही दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये स्विंगला अनुकूल व उसळी असलेल्या खेळपट्ट्यांवर खेळलेलो आहोत. अशा परिस्थितीत आम्ही मालिका बरोबरीत सोडवण्यात यशस्वी ठरलो. त्यामुळे येथे खेळताना त्यांनी खेळपट्ट्यांबाबत तक्रार करायला नको.’’ दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचे मनोधैर्य ढासळलेले आहे. त्यांना फिरकी गोलंदाजी खेळण्यास अडचण भासत आहे. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज दडपणाखाली खेळत असल्यामुळे बाद होत आहेत. त्यांनी खेळपट्टीवर तळ ठोकण्याचे धैर्य दाखविणे आवश्यक आहे.’’(वृत्तसंस्था)

Web Title: ... credentials were not received by the spinners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.