स्पर्धा घेण्यापूर्वी कॅलेंडर तयार करा
By Admin | Updated: April 24, 2015 00:30 IST2015-04-24T00:30:12+5:302015-04-24T00:30:12+5:30
राष्ट्रीय पॅराअॅथलेटिक्स स्पर्धेतील अनागोंदीपासून धडा घेऊन क्रीडा मंत्रालयाने देशातील सर्व राष्ट्रीय क्रीडा महासंघांना स्पर्धेचे आयोजन करण्याआधी योग्य कॅलेंडर तयार करण्याचे नवे निर्देश दिले आहेत.

स्पर्धा घेण्यापूर्वी कॅलेंडर तयार करा
नवी दिल्ली : राष्ट्रीय पॅराअॅथलेटिक्स स्पर्धेतील अनागोंदीपासून धडा घेऊन क्रीडा मंत्रालयाने देशातील सर्व राष्ट्रीय क्रीडा महासंघांना स्पर्धेचे आयोजन करण्याआधी योग्य कॅलेंडर तयार करण्याचे नवे निर्देश दिले आहेत.
मंत्रालयाने काढलेल्या पत्रकानुसार स्पर्धा आयोजनाची प्राथमिक जबाबदारी क्रीडा महासंघांची असेल. खेळाडूंना सर्वोत्कृष्ट कामगिरी करता यावी, यासाठी स्पर्धेच्या यशस्वी संचालनात सर्व उपाययोजना करण्यात यावी. प्रत्येक राष्ट्रीय महासंघाला दर वर्षी सिनिअर, ज्युनिअर आणि सब-ज्युनिअर स्पर्धांचे आयोजन करणे अनिवार्य असेल. काही महासंघ देशात झोनल चॅम्पियनशिप तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांचेदेखील आयोजन करू शकतात. स्पर्धेदरम्यान खेळाडूंना आवश्यक सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी मंत्रालयाला वारंवार मिळतात. यामुळेच मंत्रालयाने विविध स्पर्धा आयोजनासाठी हे नवे निर्देश दिले.
स्पर्धेचे आयोजन करणे आणि व्यवस्थापन करणे, ही जबाबदारी क्रीडा महासंघांची आहे. खेळाडू सहजपणे पोहोचू शकतील, अशा स्टेडियम किंवा इन्डोअर स्टेडियममध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे. विकलांग खेळाडूंची स्पर्धा असेल, तर विशेष व्यवस्था असावी. खेळाडूंसाठी सर्व मूलभूत सोयी उपलब्ध करून द्याव्यात. स्पर्धा सुरू होण्याआधी क्रीडा महासंघांच्या सदस्यांनी आयोजन स्थळाचे निरीक्षण करावे. खेळाडूंना विश्रांती घेण्यासाठी स्थळ असावे. पिण्याचे स्वच्छ पाणी, चहा, कॉफी आणि नाश्ता उपलब्ध असावा. याशिवाय, स्वच्छ टॉयलेट असावे. विकलांग खेळाडूंसाठी त्यांना उपयुक्त ठरतील, असे टॉयलेट तयार करावेत. मुलामुलींसाठी वेगवेगळ्या चेंजिंग रूम असाव्यात. (वृत्तसंस्था)