कोस्टारीका ठरणार का जायंट किलर ?

By Admin | Updated: July 5, 2014 04:29 IST2014-07-04T21:44:55+5:302014-07-05T04:29:10+5:30

चमकदार कामगिरी करीत विश्वकप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणाऱ्या कोस्टारिका संघाला शनिवारी खेळल्या जाणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत हॉलंडच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

Costa Rica's Giant Killer? | कोस्टारीका ठरणार का जायंट किलर ?

कोस्टारीका ठरणार का जायंट किलर ?

कोस्टारिका-हॉलंड रंगतदार लढतीची अपेक्षा
सल्वाडोर : चमकदार कामगिरी करीत विश्वकप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणाऱ्या कोस्टारिका संघाला शनिवारी खेळल्या जाणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत हॉलंडच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
स्पर्धेच्या सुरुवातीला कोस्टारिका संघाकडून विशेष अपेक्षा नव्हती. कोस्टारिकाचा समावेश असलेल्या गटात इटली, इंग्लंड व उरुग्वे यांच्यासारखे माजी विजेते संघ होते. कोस्टारिकाने उरुग्वे व इटली या संघांना पराभवाचा तडाखा देत गटात अव्वल स्थान पटकाविले. त्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत कोस्टारिकाने जवजवळ एक तास केवळ १० खेळाडूंसह खेळताना ग्रीसचा पेनल्टी शुटआऊटमध्ये पराभव केला. जॉर्ज लुई पिंटोच्या संघात आघाडीच्या फळीत जोएल कॅम्पबेल व ब्रायन रुईज यांच्यासारख्या खेळडूंचा समावेश आहे. सांघिक कामगिरी कोस्टारिका संघाच्या यशाचे गमक आहे. कोस्टारिकाविरुद्ध प्रतिस्पर्धी संघांना केवळ दोनदा गोलरेषा भेदण्यात यश आले. कोस्टारिकाने प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध पाच गोल नोंदविले आहेत. १९९० मध्ये प्री क्वॉर्टरसाठी पात्र ठरलेल्या मध्य अमेरिकन संघाने यावेळी विश्वकप स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी केलेली असल्यामुळे मायदेशात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. मायदेशातील जल्लोषाचे वातावरण कायम राखण्यात कोस्टारिका संघाला यश मिळते अथवा नाही ? याचे उत्तर शनिवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.
हॉलंड संघाची स्पर्धेतील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. मोक्याच्या क्षणी गोल नोंदविण्यात हॉलंड संघ यशस्वी ठरला आहे. २०१० मध्ये विश्वकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या हॉलंड संघाने गतचॅम्पियन स्पेनचा ५-१ ने पराभव करीत चांगली सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पिछाडीवर पडल्यानंतर ३-२ ने विजय मिळविण्यात हॉलंड संघ यशस्वी ठरला. हॉलंड संघाने त्यानंतर चिलीविरुद्ध २-० ने तर उपउपांत्यपूर्व फेरीत मेक्सिकोविरुद्ध २-१ ने विजय मिळविला. (वृत्तसंस्था)

Web Title: Costa Rica's Giant Killer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.