विराटने आक्रमक शैली कायम राखावी : द्रविड
By Admin | Updated: August 2, 2015 01:31 IST2015-08-02T01:31:47+5:302015-08-02T01:31:47+5:30
कसोटी कर्णधार म्हणून श्रीलंकेत प्रथमच पूर्ण मालिका खेळण्यासाठी जात असलेला विराट कोहली यशस्वी ठरेल, असा विश्वास भारत ‘अ’ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने व्यक्त केला.

विराटने आक्रमक शैली कायम राखावी : द्रविड
चेन्नई : कसोटी कर्णधार म्हणून श्रीलंकेत प्रथमच पूर्ण मालिका खेळण्यासाठी जात असलेला विराट कोहली यशस्वी ठरेल, असा विश्वास भारत ‘अ’ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने व्यक्त केला. कोहलीने आपली आक्रमक शैली कायम राखायला हवी, असा सल्ला द्रविडने या वेळी दिला.
कोहलीच्या मैदानावरील वर्तनाबाबत बोलताना द्रविड म्हणाला, ‘‘माझ्या मते, प्रत्येकाने आपला स्वभाव कायम राखायला हवा. वेगवेगळे वर्तन असलेले लोक या खेळामध्ये यशस्वी ठरतात, ही या खेळाची विशेषता आहे. अनेक आक्रमक क्रिकेटपटू यशस्वी
ठरतात. काही अधिक आक्रमक असतात, तर काही त्या तुलनेत कमी आक्रमक असतात.’’ कोहलीने भारत ‘अ’ संघातर्फे दुसरा सराव सामना खेळला. त्यामुळे द्रविडला त्याच्यासोबत प्रदीर्घ चर्चा करण्याची संधी मिळाली.
श्रीलंका दौऱ्यात कोहलीकडून असलेल्या अपेक्षांबाबत बोलताना द्रविड म्हणाला, ‘‘माझ्या मते, हा दौरा महत्त्वाचा आहे, पण त्याला अधिक महत्त्वपूर्ण बनवण्याची गरज नाही. प्रत्येक आंतरराष्ट्रीय दौरा महत्त्वाचा असतो. या दौऱ्यात त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी अपेक्षित
आहे. त्याचप्रमाणे सहकाऱ्यांकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याची जबाबदारी त्याची आहे. अनेकदा
बाबी अनुकूल असतात तर
अनेकदा प्रतिकूलही असतात.
तो मेहनती असून, त्याने या
सामन्यात सहभाग नोंदवला, ही चांगली बाब आहे. हा अनुभव त्याच्यासाठी उपयुक्त ठरेल.’’
चेतेश्वर पुजारा व कोहलीसोबत काय चर्चा झाली, याबाबत मात्र द्रविडने स्पष्ट केले नाही.
सराव सामन्यात आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाने भारत ‘अ’ संघावर वर्चस्व गाजवले असले तरी बेंच स्ट्रेंथबाबत चिंता करण्याची गरज नसल्याचे द्रविड म्हणाला. प्रत्येक सामन्यात उतार-चढाव अनुभवायला मिळतात. भारतीय संघात काही प्रतिभावान खेळाडू आहेत. सामन्याच्या निकालावरून त्यांच्या कामगिरीचे आकलन करता येणार नाही. ‘अ’ संघाने मालिका जिंकली किंवा हरली, ही महत्त्वाची बाब नसून आमचे लक्ष्य आंतरराष्ट्रीय पातळीसाठी खेळाडूंना सज्ज करण्याचे आहे, असेही द्रविडने या वेळी सांगितले. (वृत्तसंस्था)