Commonwealth Games 2022 : मुरली श्रीशंकरने ऐतिहासिक पदक जिंकले, 'लांब उडी' रौप्यपदक जिंकणारा ठरला पहिला भारतीय पुरुष खेळाडू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 01:44 IST
Commonwealth Games 2022 Men's Long Jump Final : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बुधवारी तेजस्वीन शंकरने उंच उडीत कांस्यपदकाची कमाई करून अॅथलेटिक्सच्या पदकांचा श्रीगणेशा केला.
Commonwealth Games 2022 : मुरली श्रीशंकरने ऐतिहासिक पदक जिंकले, 'लांब उडी' रौप्यपदक जिंकणारा ठरला पहिला भारतीय पुरुष खेळाडू
Commonwealth Games 2022 Men's Long Jump Final : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बुधवारी तेजस्वीन शंकरने उंच उडीत कांस्यपदकाची कमाई करून अॅथलेटिक्सच्या पदकांचा श्रीगणेशा केला. गुरुवारी मुरली श्रीशंकर ( Murali Sreeshankar ) व मुहम्मद अनीस याहिया ( Muhammed Anees Yahiya) या दोन लांब उडीपटूंनी कडवी टक्कर दिली. सुवर्णपदकाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या श्रीशंकर पहिल्या चार प्रयत्नांत काही खास करता आले नाही, त्यात चौथ्या प्रयत्नात -१ सेंटीमीटरमुळे त्याची ८ मीटरची लांब उडी अवैध ठरवण्यात आली. तो निराश झाला, परंतु खचला नाही. पाचव्या प्रयत्नात ८.०८ मीटर लांब उडी मारून सहाव्या क्रमांकावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लांब उडीत भारताच्या दोन महिलांनी पदक जिंकले होते, पण पुरुषांमध्ये पदक जिंकणारा श्रीशंकर हा पहिलाच भारतीय ठरला.
आजच्या फायनलमध्ये श्रीशंकर ८.३६ मीटर या सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीसह सुवर्णपदकाच्या प्रबळ दावेदारात आघाडीवर होता. त्याच्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या हॅरी फ्रेयन ( ८.३४ मी.) याचे आव्हान होते. मुहम्मद याहियाचा पहिला प्रयत्न फाऊल ठरला, परंतुय श्रीशकंरने पहिल्या प्रयत्नात ७.६० मीटर लांब उडी मारली. पहिल्या प्रयत्नांअखेर श्रीशंकर सहावा आला. बहामासच्या लॅक्यून नैर्न ( ७.९४ मी.) हा अव्वल राहिला. तुर्क अँड कैकोस आयलँड्सच्या ओटूओन्येने दुसऱ्या प्रयत्नात ७.८० मीटरची त्याची सत्रातील सर्वोत्तम कामगिरी केली. याहियाने दुसऱ्या प्रयत्नात ७.६५ मीटर, तर श्रीशंकरने ७.८४ मीटर लांब उडी मारली. दक्षिण आफ्रिकेच्या जोव्हान व्हॅन व्ह्यूरेनने त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात ८.०६ मीटर लांब उडी घेत सर्व स्पर्धकांना मागे टाकले, परंतु लॅक्यून नैर्न याने ८.०८ मीटर लांब झेप घेतली. दुसऱ्या फेरीनंतर श्रीशंकर पाचवा, तर याहिया सातवा होता. तिसऱ्या फेरीत जमैकाच्या शॉन डी थॉम्पसनने ८.०५ मीटर ही सिजन बेस्ट कामगिरी करत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. याहियाने कामगिरी सुधारताना ७.७२ मीटर लांब उडी मारली. श्रीशंकरने तिसऱ्या प्रयत्नातही ७.८४ मीटर लांब उडी मारली. स्पर्धेच्या मध्यंतरात भारताचा श्रीशंकर सहावा व याहिया आठवा राहिला. तीन प्रयत्नांनंतर आघाडीच्या ८ खेळाडूंना आणखी तीन संधी मिळतात.चौथ्या प्रयत्नात श्रीशंकरने ८ मीटरपेक्षा अधिक लांब उडी मारली खरी, परंतु लँडींग बोर्डवर - १ सेंटीमीटरच्या फरकाने त्याचा हा प्रयत्न फाऊल ठरवला गेला. या निर्णयावर श्रीशंकर नाराज दिसला. पण, त्याने पाचव्या प्रयत्नात ८.०८ मीटर लांब उडी मारली. याहियाने अखेरच्या प्रयत्नात ७.९७ मीटर लांब उडी मारून सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. पण, पदकासाठी ती अपूरी ठरली. दक्षिण आफ्रिकेच्या व्ह्यूरेनला ८.०६ मीटरसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आता ८.०८ मीटरसह संयुक्तपणे सुवर्णपदकासाठी श्रीशंकर व नैर्न हे दावेदार होते. श्रीशंकरचा सहावा प्रयत्न फाऊल ठरला, परंतु त्याने रौप्यपदक निश्चित केले. नैर्नला सुवर्णपदक मिळाले.
पाहा तो ऐतिहासिक क्षण
नुकत्याच पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मुरली श्रीशंकरने अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास घडविला होता. अंजू बॉबी जॉर्ज यांनी २००३ मध्ये जागतिक स्पर्धेत लांब उडीत अंतिम फेरीत प्रवेश करताना कांस्य जिंकले होते. त्यानंतर जागतिक स्पर्धेची फायनल गाठणारा श्रीशंकर हा दुसरा भारतीय व पहिलाच पुरुष खेळाडू ठरला होता. २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी मुरली श्रीशंकरची भारतीय संघात निवड झाली होती, परंतु १० दिवस आधी त्याला appendicitis झालं अन् त्याला माघार घ्यावी लागली. त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली आणि तो लिक्विड डाएटवर होता. त्यामुळे त्याचे वजन प्रचंड कमी झाले होते आणि परिणामी त्याला नीट चालताही येत नव्हते. पण, दोन महिन्यांत त्याने स्वतःला पुन्हा तंदुरुस्त केले आणि २०१८च्या आशियाई कनिष्ठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ७.४७ मीटर लांब उडीसह कांस्यपदक नावावर केले. त्यानंतर मागे वळून पाहिले नाही.
मुरली श्रीशंकरचे वडील एस मुरली हे माजी तिहेरी उडीपटू आहेत आणि त्यांनी दक्षिण आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुरली सराव करतो. चार वर्षांचा असल्यापासून मुरलीचा सराव सुरू आहे. मुरलीने १० वर्षांखालील राज्यस्तरीय स्पर्धेत ५० मीटर व १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता, परंतु १३व्या वर्षी तो लांब उडीकडे वळला. त्याची आई के एस बिजिमोल यांनी १९९२च्या आशियाई कनिष्ठ अॅथलेटिक्स स्पर्धेत ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. बहीण श्रीपार्वती ही हेप्टॅथलॉन खेळते. ऑगस्ट २०१९मध्ये मुरली श्रीशंकरने मॅथेमॅटिक्सम BSc पूर्ण केले.