कोच विमल कुमार यांना सोबत पाठवा : सायना
By Admin | Updated: September 11, 2014 01:56 IST2014-09-11T01:56:48+5:302014-09-11T01:56:48+5:30
आशियाडसाठी नवे कोच विमल कुमार यांना इंचियोनला घेऊन जाण्याची स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिची इच्छा आहे

कोच विमल कुमार यांना सोबत पाठवा : सायना
नवी दिल्ली : आशियाडसाठी नवे कोच विमल कुमार यांना इंचियोनला घेऊन जाण्याची स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिची इच्छा आहे. सायनाचे गोपीचंद यांचेशी जमत नसल्याने तिने आठवडाभरापासून प्रॅक्टिसची वेगळी चूल मांडली. विमल यांच्या अकादमीत सहभागी झालेल्या सायनाला यापुढे गोपीचंद यांचे मार्गदर्शन नको आहे.
भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या (बाई) एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सायनाने ‘बाई’कडे विमल कुमार यांचे नाव संघासोबत जाणाऱ्या कोचेसच्या यादीत टाकण्याची विनंती केली आहे. आम्ही केंद्र शासनाच्या अधिकाऱ्याकडे ही विनंती पाठविली आहे. त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. पुलेला गोपीचंद, मधुमिता बिश्त आणि विजयदीपसिंग या तीन कोचेसना आशियाडसाठी संघासोबत पाठविण्यात येत आहे. आता आम्ही विमलकुमार यांच्या नावाचा समावेश करू इच्छितो. त्याऐवजी यादीतून एक विश्लेषक वगळला जाईल. भारतीयांचे एकाच वेळी सामने असतील तर विविध खेळाडूंना हे कोचेस मार्गदर्शन करू शकतात.’
दुहेरीतील महत्त्वाची खेळाडू ज्वाला गुट्टा हिनेदेखील जखमी असल्याचे कारण देत आशियाडमधून माघार घेतली. तिचा पर्याय
कोण, याविषयी विचारताच हा अधिकारी म्हणाला, ज्वालाचा पर्याय कुणीही नसेल. मुख्य कोचने १५ खेळाडूंसोबतच खेळण्याचे ठरविले आहे.
अश्विनी पोनप्पा आणि प्रज्ञा गद्रे यांच्याशिवाय दुहेरीत खेळू शकणारी पी. व्ही. सिंधू संघात आहे. सिंधू याआधी दुहेरीत खेळली होती. सरकारने आधीच खेळाडूंच्या यादीला कात्री लावल्याने, ज्या चार बॅडमिंटनपटूंवर कुऱ्हाड कोसळली त्यात अपर्णा बालन, रितुपर्णा दास, तरुण कोना आणि अरुण विष्णू यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)