चीन नवव्यांदा अव्वल स्थानाचा दावेदार

By Admin | Updated: September 9, 2014 03:50 IST2014-09-09T03:50:29+5:302014-09-09T03:50:29+5:30

आशियाई स्पर्धेत २८ ऑलिम्पिक व ८ बिगर ऑलिम्पिक खेळांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने ४३९ सुवर्णपदकांसाठी चुरस

China's ninth-best place holder | चीन नवव्यांदा अव्वल स्थानाचा दावेदार

चीन नवव्यांदा अव्वल स्थानाचा दावेदार

सेऊल : ऑलिम्पिक व आशियात खेळांमध्ये महाशक्ती असलेला चीन दक्षिण कोरियातील इंचियोनमध्ये १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित १७ व्या आशियाई स्पर्धेत सलग नवव्यांदा पदकतालिकेत अव्वल स्थान पटकाविण्याच्या निर्धाराने सहभागी होणार आहे.
१७ व्या आशियाई स्पर्धेत १0 हजार खेळाडू सहभागी होणार असून, १६ दिवसांच्या या स्पर्धेत सहभागी होणार्‍या खेळाडूंच्या संख्येचा विचार करता, ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार्‍या खेळाडूनंतर ही दुसर्‍या क्रमांकाची स्पर्धा ठरणार आहे. 
आशियाई स्पर्धेत २८ ऑलिम्पिक व ८ बिगर ऑलिम्पिक खेळांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने ४३९ सुवर्णपदकांसाठी चुरस अनुभवाला मिळणार असून, त्यात आशियातील प्रतिभावान खेळाडूंची क्षमता सिद्ध होणार आहे. या स्पर्धेत सर्वाधिक पदकांची कमाई करीत चीन सलग नवव्यांदा अव्वल स्थान पटकाविणार असल्याचे जवळजवळ निश्‍चित आहे. यजमान दक्षिण कोरियाने ९0 सुवर्णपदके जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. परंपरागत प्रतिस्पर्धी जपानपेक्षा अधिक पदके पटकाविण्याचे कोरियाचे लक्ष्य आहे. 
क्रीडा जगतात भारत अपेक्षेपेक्षा कमकुवत कामगिरीसाठी ओळखल्या जातो. चार वर्षांपूर्वी ग्वांग्झू आशियाई स्पर्धेत भारताने १४ सुवर्णपदके पटकाविण्याची कामगिरी केली होती. यावेळी यामध्ये सुधारणा करण्यास भारत प्रयत्नशील आहे. 
भारताने अद्याप आशियाई स्पर्धेसाठी पथक जाहीर केलेले नाही. ग्वांग्झूच्या शानदार आयोजनानंतर यावेळी दक्षिण कोरियाने आयोजनासाठी जवळजवळ १.२ अब्ज डॉलर्स खर्च केलेले आहेत. दक्षिण कोरिया तिसर्‍यांदा प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे यजमानपद भूषविणार आहे. 
आर्थिक अडचणीमध्ये असलेला चीन इंचियोनमध्ये ८९९ खेळाडूंचे सर्वात मोठे पथक पाठविण्यासाठी सज्ज आहे.
चीनचे खेळाडू जलतरण, जिम्नॅस्टिक, टेबल टेनिस आणि बॅडमिंटनमध्ये आपले वर्चस्व कायम राखण्यास उत्सुक आहेत. त्याचप्रमाणे चीनचे खेळाडू अन्य ३२ क्रीडा प्रकारात पदक जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
आशिया खंडातील अनेक खेळाडू या स्पर्धेत छाप सोडण्याच्या निर्धाराने कोरियात दाखल होत असताना, दक्षिण कोरियातील खेळाडूंसाठी ही स्पर्धा प्रतिष्ठेची झाली आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणार्‍या दक्षिण कोरियातील खेळाडूंना सेनेमध्ये दोन वर्षांची सक्तीची सेवा देण्याच्या अटीतून सूट मिळणार आहे. 
दक्षिण कोरिया व शेजारी उत्तर कोरिया यांच्यादरम्यान नेहमी युद्धजन्य स्थिती असते. उभय देशांदरम्यान १९५0-५३ च्या युद्धानंतर सलोखा झाला नव्हता. त्यामुळे येथे दोन वर्षे सेनेसाठी देणे अनिवार्य आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कोरियाने आशियाडमध्ये सुवर्ण व ऑलिम्पिकमध्ये कुठलेही पदक पटकाविणार्‍या खेळाडूंना यात सूट जाहीर केलेली आहे. 
उत्तर कोरियाने आपल्या खेळाडूंना स्पर्धेसाठी पाठविण्यापूर्वी गेल्या महिन्यात ३५0 चीअर लिडर्स न पाठविण्याचा निर्णय घेतला होता. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर राजकीय लाभ घेण्यासाठी खेळाचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप केला होता. 
उत्तर व दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनी २000 च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये एकत्र मार्चपास्ट केले होते. पण त्यानंतर उभय देशांदरम्यानचे संबंध सुधारण्यापेक्षा अधिक बिघडले. खेळाडूंना या स्पर्धेसाठी पाठविण्याबाबत उभय देशांदरम्यान चर्चा सुरू असून, दक्षिण कोरिया १५0 खेळाडूंचे पथक पाठवेल, अशी आशा आहे.
२0२0 च्या आशियाई स्पर्धेचे यजमानपद जपानला (टोकियो) मिळालेले आहे. जपानने दोन वर्षांपूर्वी लंडन ऑलिम्पिकमध्ये केवळ सात सुवर्णपदकांची कमाई केली होती. चार वर्षांपूर्वी जपान आशियाई स्पर्धेत पदकतालिकेत चीन व दक्षिण कोरियानंतर तिसर्‍या स्थानावर होता. जपान आशियाई स्पर्धेसाठी ७१६ खेळाडूंचे पथक पाठविणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: China's ninth-best place holder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.