चिमुरड्या सुहानीने नोंदवला कॅण्डीडेट मास्टरचा विक्रम
By Admin | Updated: July 18, 2016 21:51 IST2016-07-18T21:51:39+5:302016-07-18T21:51:39+5:30
येथील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनलची सहा वर्षीय बुध्दिबळपटू सुहानी लोहियाने नवा पराक्रम नोंदवताना मुंबईची पहिली महिला कॅण्डीडेट मास्टरचा किताब पटकावला.

चिमुरड्या सुहानीने नोंदवला कॅण्डीडेट मास्टरचा विक्रम
आशियाई कांस्य पदक : किताब मिळवणारी पहिली महिला मुंबईकर खेळाडू
मुंबई : येथील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनलची सहा वर्षीय बुध्दिबळपटू सुहानी लोहियाने नवा पराक्रम नोंदवताना मुंबईची पहिली महिला कॅण्डीडेट मास्टरचा किताब पटकावला.
प्रशिक्षक व फिडे मास्टर बालाजी गुटुला यांनी दिलेल्या माहितीनुसार सुहानीने रविवारी इराण (तेहराण) येथे झालेल्या आशियाई शालेय बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या ७ वर्षांखालील गटात कांस्य पदक पटकावून हा मान मिळवला. सुहानीने नऊ पैकी सात गुण पटकावून कांस्य पटकावले. त्याचवेळी फिलिपिन्सच्या मेसेक एंजेला (८) आणि उझबेकिस्तानच्या खामदामोवा अफ्रुजा (७.५) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पटकावले.
संपुर्ण आशिया खंडातील एकूण १७ देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत चीन, सिंगापूर, फिलिपिन्स, उझबेकिस्तान आणि यजमान इराण सारखे बलाढ्य देश सहभागी होते. या स्पर्धेत चमकदार यश मिळवताना सुहानीने जागतिक बुध्दिबळ संघटनेच्या (फिडे) वतीने देण्यात येणारा महिला कॅण्डीडेटचा किताब पटकावताना पहिली महिला मुंबईकर खेळाडू म्हणून विक्रम नोंदवला.
यंदा नागपूरला झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पटकावल्यानंतर सुहानी यावर्षाच्या अखेरीस जॉर्जियामध्ये होणाऱ्या जागतिक युवा बुध्दिबळ अजिंक्यपद सहभागी होणार असल्याची माहिती गुटुला यांनी दिली. (वृत्तसंस्था)