चिली कांगारूवर दबाव ठेवणार?
By Admin | Updated: June 13, 2014 04:33 IST2014-06-13T04:33:48+5:302014-06-13T04:33:48+5:30
आॅस्ट्रेलियाने जर मार्चमध्ये इक्वाडोरविरुद्ध लंडनमध्ये आपल्या विश्वचषकाच्या सराव सामन्याची पुनरावृत्ती केली

चिली कांगारूवर दबाव ठेवणार?
कुईआबा : आॅस्ट्रेलियाने जर मार्चमध्ये इक्वाडोरविरुद्ध लंडनमध्ये आपल्या विश्वचषकाच्या सराव सामन्याची पुनरावृत्ती केली, तर या संघाचा चिलीविरुद्ध शुक्रवारी होणारा ‘ब’ गटातील सामना जबरदस्त रोमहर्षक होण्याची शक्यता आहे. आॅस्ट्रेलिया आणि चिली हे संघ चार वेळेस एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यात चिलीने तीन वेळेस विजय मिळवला आहे तर या दोन संघांतील एक सामना ड्रॉ राहिला आहे. त्यामुळे ब्राझील येथे होणाऱ्या विश्वचषक लढतीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध चिली संघाचे पारडे खूपच जड आहे.
तथापि, मार्च महिन्यात इक्वाडोरविरुद्ध आॅस्ट्रेलियाने सराव सामन्यात खूपच चांगली कामगिरी केली होती आणि संघाने सुरुवातीलाच ३-0 अशी आघाडी घेतली होती. तथापि, नंतर इक्वाडोरने जबरदस्त मुसंडी मारताना हा सामना ४-३ असा जिंकला होता; परंतु आॅस्ट्रेलियाच्या या कामगिरीने त्यांच्याकडून ब्राझीलमध्ये चांगल्या कामगिरीच्या आशा उंचावल्या आहेत.
चिलीने क्वॉलीफाइंग राऊंडमध्ये १६ सामन्यांत २९ गोल केले आहेत आणि दक्षिण अमेरिकेत अर्जेंटिना आणि कोलंबियानंतर ते तिसऱ्या स्थानावर राहिले होते. चिलीसाठी या सामन्यात स्ट्रायकर एडुराडो वार्गस आणि मिडफिल्डर आरटुरो विदाल यांनी प्रत्येकी ५ गोल केले होते. दुसरीकडे आॅस्ट्रेलियाचा संघ टीम काहील यावर सर्वाधिक अवलंबून आहे. काहीलने राष्ट्रीय संघाकडून ६८ सामन्यांत विक्रमी ३२ गोल केले आहेत.
या गटात गत चॅम्पियन स्पेन आणि उपविजेता हॉलंड यांचा समावेश असल्यामे आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात चिलीचा प्रयत्न हा सामना जिंकून पूर्ण ३ गुण वसूल करण्याचा असणार आहे. चिलीचा संघ त्यांच्याच उपखंडात खेळत आहे; परंतु कुईआबा येथील वातावरण लेटिन अमेरिकेच्या अपेक्षेपक्षा युरोपशी मिळतेजुळते आहे. त्यामुळे चिलीला उद्याच्या लढतीत घरच्या वातावरणासारखी येथील स्थिती नसणार आणि त्याचा परिणामही त्यांच्या खेळावर होऊ शकतो. (वृत्तसंस्था)