बत्रांचा आर्थिक घोटाळ्याचा आरोप
By Admin | Updated: November 19, 2014 04:11 IST2014-11-19T04:11:30+5:302014-11-19T04:11:30+5:30
हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक टेरी वॉल्श यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले आहेत.

बत्रांचा आर्थिक घोटाळ्याचा आरोप
नवी दिल्ली : हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक टेरी वॉल्श यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे आॅस्ट्रेलियन वॉल्श भविष्यात संघाच्या प्रशिक्षकपदी कायम राहतील का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बत्रा यांनी वॉल्श यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की,‘अमेरिकन हॉकीसोबत जुळलेले असताना विद्यमान भारतीय संघाच्या प्रशिकांनी एक लाख ७६००० डॉलर्सच्या रकमेची अफरतफर केली होती.’ वॉल्श गेल्या वर्षापासून भारतीय हॉकी संघाचे प्रश्क्षिकपद सांभाळत आहेत.
बत्रा यांनी केलेल्या आरोपावर आश्चर्य व्यक्त करताना वॉल्श म्हणाले, ‘बत्रा ज्या रकमेबाबत बोलत आहेत ती रक्कम माझ्या व हॉकी यूएस यांच्या दरम्यान झालेल्या कराराची रक्कम आहे. मी यूएस हॉकीला एक करार सादर केला होता. त्यात ते मी तयार केलेल्या सॉफ्टवेअरचा उपयोग करीत होते. त्यांनी २०१० मध्ये स्टिव्ह लोके यांची हाय फरफोर्मेन्स समीक्षकपदी नियुक्ती केली. मी हॉकी यूएसला सांगितले की, ते माझे सॉफ्टवेअर असून तुम्ही याचा वापर करू शकत नाही.’
आपल्या मार्गदर्शनाखाली भारतीय हॉकी संघाला आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या वॉल्शविरुद्ध बत्रा यांना मोहीम उघडली आहे. बत्रा यांनी हा मुद्दा वॉल्श यांनी प्रशिक्षक म्हणून केलेल्या मागण्यावर विचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तीन सदस्यीय समितीच्या प्रमुखपदी असलेल्या अजितपाल सिंग यांच्या समोर उपस्थित केला. बत्रा म्हणाले, ‘मी हा मुद्दा अजितपाल सिंग यांच्यापुढे उपस्थित केला. आर्थिक घोटाळ्याचा आरोप असलेल्या व्यक्तीसोबत काम करण्यास इच्छुक नाही. वॉल्श यांना या प्रकरणात हॉकी यूएससोबत चर्चा करून तोडगा काढणे आवश्यक आहे. अन्यथा आम्हाला भविष्यात प्रशिक्षक म्हणून त्यांची सेवा घेता येणार नाही. आरोप असलेल्या व्यक्तीला हॉकी इंडियामध्ये स्थान नाही.’ (वृत्तसंस्था)