बिथरलेल्या पंजाबपुढे चेन्नई सुपरचे आव्हान

By Admin | Updated: May 30, 2014 04:14 IST2014-05-30T04:14:31+5:302014-05-30T04:14:31+5:30

आयपीएल-७ मध्ये नवीन शक्ती बनून उदयास आलेल्या आणि संपूर्ण सत्रामध्ये टॉपर राहिलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबला स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्ज संघाविरुध्द लढावे लागेल

Chennai Super challenge against Punjab, which was scorched | बिथरलेल्या पंजाबपुढे चेन्नई सुपरचे आव्हान

बिथरलेल्या पंजाबपुढे चेन्नई सुपरचे आव्हान

विनय नायडू, मुंबई  - आयपीएल-७ मध्ये नवीन शक्ती बनून उदयास आलेल्या आणि संपूर्ण सत्रामध्ये टॉपर राहिलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबला स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्ज संघाविरुध्द लढावे लागेल. पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्ससंघाकडून पराभूत झाल्यामुळे बिथरलेल्या पंजाबचा संघ चेन्नईला सहाव्यांदा अंतिम फेरी गाठण्यापासून रोखतो का हे पाहणे मनोरंजक ठरले. यापूर्वी उभय संघांदरम्यान साखळी फेरीत खेळल्या गेलेल्या दोन्ही लढतींमध्ये मॅक्सवेलच्या कामगिरीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने बाजी मारली. वानखेडे स्टेडियममध्ये शुक्रवारी क्वालिफायरची दुसरी लढत रंगणार आहे. देशाच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करुन आलेल्या पंजाबला हरवून साखळी फेरीत पत्कराव्या लागलेल्या दोन पराभवाची सव्याज परतफेड करण्याची संधी चेन्नई संघाला उपलब्ध झाली आहे. या लढतीत विजय मिळविणारा संघ १ जून रोजी कोलकाता नाईटरायडर्सविरुद्ध खेळल्या जाणार्‍या अंतिम लढतीसाठी पात्र ठरणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाला सहाव्यांदा अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम करण्यासाठी मॅक्सवेलला रोखणे आवश्यक आहे. मॅक्सवेलने चेन्नईच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजविले आहे. त्यात रविचंद्रन अश्विन व रविंद्र जडेजा या दोन फिरकीपटूंचा प्रामुख्याने समावेश आहे. मॅक्सवेलने यंदाच्या मोसमात ५३९ धावा फटकाविल्या आहे. सर्वांधिक धावा फटकाविणार्‍या फलंदाजांमध्ये मॅक्सवेल तिसर्‍या स्थानी आहे. मॅक्सवेलने चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध गेल्या महिन्यात अबुधाबीमध्ये ४३ चेंडूंमध्ये ९५ तर कटकमध्ये ३५ चेंडूंमध्ये ९० धावांची खेळी करीत पंजाब संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पंजाब संघाला चेन्नईचे आव्हान पेलण्यासाठी सांघिक कामगिरीची गरज आहे. मॅक्सवेल, मिलर, सेहवाग, मनन व्होरा, रिद्धिमान साहा व कर्णधार जॉर्ज बेली यांच्या समावेश असलेल्या पंजाब संघाला रोखण्याचे चेन्नईच्या गोलंदाजांपुढे आव्हान राहणार आहे. संदीप शर्मा (१७ बळी), अक्षर पटेल (१६ बळी), लक्ष्मीपती बालाजी (१२ बळी) आणि आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन (१४ बळी) यांच्या समावेशामुळे पंजाब संघाची गोलंदाजीची बाजू दर्जेदार आहे. मॅक्युलम परतल्याने आणि डेव्हीड हसीच्या समावेशाने चेन्नईची बॅटिंग आणखीनच मजबूत झाली आहे. सुरेश रैना पिवळ्या जर्सीत नेहमीच चांगली कामगिरी करतो, तर धोनीसारखा जागतिक दर्जाचा फिनिशर ही चेन्नईची जमेची बाजू आहे. जडेजा आणि अश्विन हे अष्टपैलू भूमिका बजावू शकतात. पंजाब संघाने पहिल्या क्वालिफायर सामन्यात संदीप शर्मा व बालाजी यांना विश्रांती देताना लेगस्पिनर करणवीर सिंग व परविंदर अवाना यांना संधी दिली. शुक्रवारी खेळल्या जाणार्‍या महत्त्वाच्या लढतीत मात्र संदीप शर्मा व बालाजी यांना संघात स्थान मिळेल,अशी आशा आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Chennai Super challenge against Punjab, which was scorched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.