चेन्नई स्मॅशर्स उपांत्य फेरीत
By Admin | Updated: January 14, 2016 03:15 IST2016-01-14T03:15:52+5:302016-01-14T03:15:52+5:30
ख्रिस एडकॉक - पिया जेबादिया या मिश्र दुहेरी जोडीने बंगळुरु टॉप गन्स संघाच्या ट्रम्प लढतीत अश्विनी पोनप्पा - जे. एफ. नील्सी यांना पराभवाचा धक्का देताना चेन्नई स्मॅशर्सला ४-१ असे

चेन्नई स्मॅशर्स उपांत्य फेरीत
बंगळुरु : ख्रिस एडकॉक - पिया जेबादिया या मिश्र दुहेरी जोडीने बंगळुरु टॉप गन्स संघाच्या ट्रम्प लढतीत अश्विनी पोनप्पा - जे. एफ. नील्सी यांना पराभवाचा धक्का देताना चेन्नई स्मॅशर्सला ४-१ असे विजयी केले. यासह चेन्नई संघाने पीबीएलच्या उपांत्य फेरीत दिमाखावत प्रवेश केला. त्याचवेळी दिल्ली एसर्स संघाने दणदणीत विजय मिळवताना मुंबई रॉकेट्सचा ५-० असा फडशा पाडून गुण तालिकेतील आपले अग्रस्थान पक्के केले.
सामन्यातील पहिलीच पुरुष एकेरीची लढत चेन्नईची ट्रम्प होती. यामध्ये चेन्नईच्या सोनी ड्वी कुनकोरोने १५-१०, १०-१५, १५-८ असा झुंजार विजय मिळवत बंगळुरुच्या समीर वर्माला नमवले. यानंतर हून थिएन हाऊ - नील्सी यांनी पुरुष दुहेरीत चेन्नईच्या एडकॉक - प्रणव चोपरा यांना १५-७, १५-८ असा धक्का दिला. श्रीकांतने पुरुष एकेरीत चेन्नईच्या ब्राइस लीवरडेजला नमवून बंगळुरुला बरोबरी साधून दिली. यानंतर पीव्ही सिंधूने बंगुळुरुच्या सुओ डी को हिचा २-० असा धुव्वा उडवून संघाचा विजय जवळपास निश्चित केला. अखेरचा मिश्र दुहेरीचा सामना बंगळुरुची ट्रम्प लढत होती. मात्र यावेळी एडकॉक - जेबादिया यांनी बंगळुरुच्या अश्विनी - नील्सी यांना १५-१४, १५-१२ असे पराभूत करुन त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले.
दुसऱ्या बाजूला दिल्ली एसर्सने धमाकेदार विजय मिळवताना मुंबई रॉकेट्सला ५-० असे क्रॅश केले. या सामन्यात मुंबईने आपल्या ट्रम्प लढतीसह सर्व लढती गमावल्या. मात्र या पराभवानंतरही मुंबईने उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळवले. बंगळुरुचा पराभव मुंबईच्या पथ्यावर पडल्याने त्यांनी उपांत्य फेरीतील जागा निश्चित केली. हैदराबाद व बंगळुरु स्पर्धेबाहेर फेकले गेले. (वृत्तसंस्था)