चेन्नई स्लॅमला विजेतेपद

By Admin | Updated: August 2, 2016 04:20 IST2016-08-02T04:20:50+5:302016-08-02T04:20:50+5:30

चेन्नई स्लॅम संघाने नियोजनबद्ध खेळ करीत यूबीए प्रो बास्केटबॉल लीगच्या तिसऱ्या सत्राचे विजेतेपद पटकावले.

Chennai Slam wins title | चेन्नई स्लॅमला विजेतेपद

चेन्नई स्लॅमला विजेतेपद


पुणे : चेन्नई स्लॅम संघाने नियोजनबद्ध खेळ करीत यूबीए प्रो बास्केटबॉल लीगच्या तिसऱ्या सत्राचे विजेतेपद पटकावले. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेली निर्णायक लढत चेन्नईने ६९-५९ अशी जिंकली.
धडाकेबाज खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या पंजाबला गेल्या लढतीतील आपला फॉर्म कायम ठेवण्यात अपयश आले. दुसरीकडे, योग्य नियोजन आणि कल्पकतेची जोड देऊन चेन्नईने चारही क्वाटर्समध्ये वर्चस्व राखले. यासह चेन्नईने १० लाख, तर उपविजेत्या पंजाबने ५ लाखांच्या पारितोषिकवर कब्जा केला.
सामन्याचा प्रारंभ फायनलला साजेशा झाला. दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करीत वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंजाबच्या आक्रमणाला नियोजनाची जोड नव्हती. यामुळे चेन्नईला पहिल्या क्वार्टरमध्ये १९-१८ अशी अल्प पण महत्वाची आघाडी घेता आली. चेन्नईने टर्नओव्हर्स मधून ६ तर, पंजाबने २ गुण प्राप्त केले. सेकंड चान्स पॉइंटमधून चेन्नईने २, तर पंजाबने ४ गुणांची कमाई केली.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये चेन्नईच्या खेळाडूंनी काऊंटर अटॅक करीत पंजाबला बॅकफूटवर ढकलले. आशुतोषने शैलीदार खेळाच्या जोरावर मध्यंतराला ५ मिनिटे शिल्लक असताना चेन्नईला ३०-१८ अशी १२ गुणांची आघाडी मिळवून दिली. जयराम व गोपाळ यांना दुखापत होऊनही चेन्नईने मध्यंतराला ३६-२४ अशी आघाडी मिळवली. स्टार खेळाडू गॅरीचे अपयश पंजाबसाठी महागडे ठरले.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये पंजाबचे पुनरागमनाचे प्रयत्न उधळून लावत चेन्नईने ५०-४० अशी आघाडी घेतली. चौथ्या आणि अंतिम क्वार्टरमध्ये पंजाबने गुणांचा सपाटा लावला. या ‘लो स्कोअरिंग’ सामन्यात चेन्नईच्या दुखापतींचा फायदा उचलण्यातही पंजाब अपयशी ठरले. जयरामला दुखापत असूनही तो २५ मिनिटे मैदानावर होता. (क्रीडा प्रतिनिधी)
निर्णायक कामगिरीसह कॅमे ठरला हीरो
चेन्नईसाठी १७ गुणांची कमाई करणारा कॅमे ‘फायनल हीरो’ ठरला. त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. पंजाबकडून रायनने सर्वाधिक १३ गुणांची कमाई केली. पुणे पेशवाजच्या नरेंदर ग्रेवालला तिसऱ्या हंगामातील ‘मोस्ट व्हल्युएबल प्लेयर’ म्हणून गौरविण्यात आले. नरेंदरने या हंगामात सरासरी ३१.८ गुणांची कमाई केली. शिवाय स्कोरिंग टायटलदेखील त्यानेच पटकावले.
अंतिम निकाल :
चेन्नई स्लॅम : ६९ ( कॅमे १७, आशुतोष १७, अगू १५) विवि पंजाब स्टिलर्स : ५९ (रायन १३, राजवीर १३, हरमनदीप १२)

Web Title: Chennai Slam wins title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.