चेन्नई ‘एक्स्प्रेस सुपरफास्ट’!
By Admin | Updated: April 26, 2015 01:35 IST2015-04-26T01:35:54+5:302015-04-26T01:35:54+5:30
महेंद्रसिंह धोनीची नाबाद ४१ धावांची खेळी आणि त्यानंतर जडेजाचे ३ बळी यांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबचा ९७ धावांनी धुव्वा उडवला.

चेन्नई ‘एक्स्प्रेस सुपरफास्ट’!
पंजाबवर ९७ धावांनी मात : मॅक्युलमचे अर्धशतक, जडेजाचे ३ बळी
चेन्नई : ब्रँडन मॅक्युलमचे झुंझार अर्धशतक (४४ चेंडूंत ६६), कर्णधार महेंद्रसिंह धोनीची नाबाद ४१ धावांची खेळी आणि त्यानंतर जडेजाचे ३ बळी यांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबचा ९७ धावांनी धुव्वा उडवला. १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा डाव २० षटकांत अवघ्या ९५ धावांवर आटोपला. त्यांच्या मुरली विजयने सर्वाधिक ३४ धावा केल्या. इतर फलंदाजांनी चेन्नईच्या गोलंदाजांपुढे नांगी टाकली.
प्रत्युत्तरात, पंजाबची सुरुवात धक्कादायक झाली. त्यांनी आपले पाच फलंदाज अवघ्या ५५ धावांवर गमावले. यामध्ये वीरेंद्र सेहवाग (१), शॉन मार्श (१०), जॉर्ज बेली (१) आणि मिलर (३) आणि मुरली विजय (३४) यांचा समावेश आहे. अर्धा संघ दहाव्या षटकात तंबूत परतल्याने सामन्यात केवळ चेन्नईच्या विजयाची औपचारीकताच बाकी होती. रवींद्र जडेजाने बेली आणि मिलर या दोघांचा अडथळा दूर केला तर पांडेने सेहवागला बाद केले. मध्यमफळीत रिद्धिमान साहाने (१५) प्रयत्न केला. पटेल (९), जॉन्सन (१), अनूरित सिंग (१०) हेसुद्धा झटपट बाद झाले. चेन्नईकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ३, आशिष नेहरा आणि आर. आश्विनने प्रत्येकी २ तर पांडे आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
त्याआधी, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय सलामीवीरांना यशस्वी ठरवला. ड्वेन स्मिथ (२६) आणि ब्रँडन मॅक्युलम (६६) यांनी पहिल्या गड्यासाठी अर्धशतकीय भागीदारी केली. स्मिथ अनुरित सिंगच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्याने अवघ्या १३ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २६ धावा ठोकल्या. तो बाद झाल्यानंतर मॅक्युलम आणि सुरेश रैना या जोडीने सूत्रे स्वीकारली. या दोघांनीही पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली.रैनाने २५ चेंडूंत २९ धावा केल्या. त्याने ४ चौकार लगावले. रैनाने मॅक्युलमसोबत दुसऱ्या गड्यासाठी ६६ धावांची भागीदारी केली. पटेलच्या चेंडूवर बेलीने मॅक्युलमचा झेल टिपला.
मॅक्युलमने ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४४ चेंडूंत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर रैनाही परतला. त्यानंतर धोनी आणि जडेजा या जोडीने ४८ धावांची भागीदारी केली. यामध्ये धोनीने २७ चेंडूंत नाबाद ४१ धावांची खेळी केली. त्याने २ चौकार आणि २ षटकार ठोकले. जडेजाने ११ चेंडूंत नाबाद ११ धावा केल्या. चेन्नईला १९२ धावापर्यंत मजल मारता आली. पंजाबकडून अनूरित आणि पटेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला(वृत्तसंस्था)
धावफलक :
चेन्नई सुपरकिंग्ज : ड्ेवन स्मिथ त्रि. गो. अनुरित सिंग २६ ब्रँडन मॅक्युलम झे.मिलर गो. पटेल ६६ सुरेश रैना धावबाद (करणवीर सिंग) २९, महेंद्र सिंग धोनी नाबाद ४१, रविंद्र जडेजा नाबाद १८; अवांतर : १२; एकूण : ३ बाद १९२; गोलंदाजी : करणवीर सिंग ४-०-०-४३-०, संदीप शर्मा ४-०-३२-०, अनुरित सिंग ४-०-४०-१, मिशेल जॉनसन ४-०-४०-०, अक्षर पटेल ४-०-३५-१
किंग्ज इलेव्हन पंजाब : मुरली विजय झे. ब्राव्हो गो. आश्विन ३४, वीरेंद्र सेहवाग झे. डु प्लेसिस गो. पांडे १, शॉन मार्श पायचीत गो. नेहरा १०, जॉर्ज बेली झे. धोनी गो. जडेजा १, डेव्हिड मिलर झे. रैना गो. जडेजा ३, रिद्धिमान साहा झे. आश्विन गो. नेहरा १५, अक्षर पटेल यष्टीचीत धोनी गो. आश्विन ९, मिशेल जॉन्सन झे. नेहरा गो. जडेजा १, अनुरितसिंग झे. जडेजा गो. शर्मा १०, कर्णवीरसिंग नाबाद २, संदीप शर्मा नाबाद १; अवांतर : ८, एकूण : ९ बाद ९५; गोलंदाजी : ईश्वर पांडे २-०-१७-१, आशिष नेहरा ४-०-१६-२, मोहित शर्मा ३-०-१०-१, रवींद्र जडेजा ४-०-२२-३, आर. आश्विन ४-०-१४-२, ड्वेन ब्राव्हो ३-०-१३-०.