केकेआरपुढे चेन्नईचे आव्हान
By Admin | Updated: May 20, 2014 00:42 IST2014-05-20T00:42:33+5:302014-05-20T00:42:33+5:30
सलग चार सामन्यांत विजय मिळविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या केकेआर (कोलकाता नाईट रायडर्स) संघाला गृहमैदानावर चेन्नई सुपरकिंग्जच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

केकेआरपुढे चेन्नईचे आव्हान
कोलकता : सलग चार सामन्यांत विजय मिळविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या केकेआर (कोलकाता नाईट रायडर्स) संघाला गृहमैदानावर चेन्नई सुपरकिंग्जच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या लढतीत सरशी साधत प्लेआॅफमध्ये स्थान पक्के करण्यास केकेआर संघ उत्सुक आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये प्रारंभ झालेली ही स्पर्धा आता निर्णायक वळणावर असून, केकेआर संघाला गृहमैदानावर खेळण्याचा लाभ मिळणार आहे. केकेआर संघाची भिस्त फिरकीपटू सुनील नरेनच्या कामगिरीवर अवलंबून आहे. प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्यात यशस्वी ठरलेल्या नरेनने या स्पर्धेत १५ बळी घेतले आहेत. या व्यतिरिक्त आक्रमक फलंदाज रॉबिन उथप्पाला गवसलेला सूर केकेआर संघासाठी जमेची बाजू आहे. उथप्पाने भारतात खेळल्या गेलेल्या ६ सामन्यांत ५४.१६ च्या सरासरीने धावा फटकाविल्या आहेत. त्यात दोन अर्धशतकी खेळींचा समावेश आहे. उथप्पाने ११ सामन्यांत ४२२ धावा फटकाविल्या असून, त्यात भारतात त्याने ३२५ धावा फटकाविण्याची कामगिरी केली आहे. कर्णधार गौतम गंभीरलाही सूर गवसला आहे. रविवारी हैदराबादविरुद्धच्या विजयात रॅन टेन डोएश्चे व मॅचविनर युसूफ पठाण यांची खेळी केकेआर संघासाठी दिलासा देणारी ठरली आहे. युसूफने २७ चेंडूंमध्ये ३८ धावा फटकाविल्या, तर डोएश्चेने अखेरच्या षटकात षटकार व चौकार ठोकत १० धावा वसूल केल्या. प्लेआॅफच्या चौथ्या स्थानासाठी केकेआर, आरसीबी आणि हैदराबाद संघांदरम्यान चुरस आहे. केकेआर संघाच्या खात्यावर बँगलोरच्या तुलनेत दोन आाणि हैदराबादच्या तुलनेत चार गुण अधिक आहेत. केकेआर संघाला दोनदा विजेतेपद मिळविणार्या व आयपीएलमध्ये कामगिरीत सातत्य राखणार्या चेन्नई संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे गंभीरच्या नेतृत्वाखालील केकेआर संघाला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. ११ सामन्यांत ८ विजय मिळविणारा चेन्नई संघ गुणतालिकेत दुसर्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)