विंडीज संघासमोर ३३१ धावांचे आव्हान
By Admin | Updated: October 17, 2014 19:57 IST2014-10-17T18:43:56+5:302014-10-17T19:57:37+5:30
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज चौथा एक दिवसीय सामना सुरु असून भारताने विंडीज संघासमोर ३३१ धावांचे आव्हान ठेवले आहे.

विंडीज संघासमोर ३३१ धावांचे आव्हान
ऑनलाइन लोकमत
धर्मशाला, दि. १७ - विराट कोहलीच्या झंझावाती १२७ धावांच्या बळावर चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला ३३१ धावांचे आव्हान दिले आहे. भारताने ५० षटकांत सहा गडी गमावत ३३० धावा केल्या असून सुरैशा रैनाने तडाखेबाज अर्धशतक ठोकून कोहलीला साथ दिली.
चौथ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजचा कप्तान ब्राव्होने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन व अजिंक्य रहाणे या सलामीवीरांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली. हे दोघेही मोठी धावसंख्या उभारतील असे दिसत असतानाच विंडीजचा गोलंदाज अँड्रे रसेलने शिखर धवनला (३५ धावा) बाद करत भारताला ७० धावांवर पहिला धक्का दिला. यानंतर अजिंक्य रहाणेने विराट कोहलीच्या साथीने भारताला डाव पुढे नेला. विंडीजचा गोलंदाज सुलेमान बेन याच्या गोलंदाजीवर रहाणे पायचीत झाला. अवघ्या सहा धावा करत भारतीय कप्तान महेंद्र सिंह धोनी धावचीत झाला. तब्बल पाच षटकार आणि तीन चौकार लगावत सुरेश रैनाने फक्त ५८ चेंडूत ७१ धावा केल्याने प्रेक्षक आणि संघाच्या त्याच्याकडून अपेक्षा उंचावल्या असतानाच रामादिनकडे झेल गेल्याने रैना बाद झाला. भारतीय संघात सर्वात उल्लेखनीय फलंदाजी विराट कोहली केली आहे. तब्बल १३ चौकार व तीन षटकार लगावत कोहलीने आपल्या फलंदाजीचे विराट दर्शन क्रिकेट शौकिनांना घडवले.