मुंबईला २८० धावांचे आव्हान

By admin | Published: November 25, 2015 03:01 AM2015-11-25T03:01:06+5:302015-11-25T03:01:06+5:30

फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे मध्य प्रदेश विरुद्ध ७८ धावांनी पिछाडीवर पडलेल्या मुंबईने जबरदस्त पुनरागमन करताना दुसऱ्या डावात मध्य प्रदेशचा डाव २०१ धावांत संपुष्टात आणला

Chasing 280 for Mumbai | मुंबईला २८० धावांचे आव्हान

मुंबईला २८० धावांचे आव्हान

Next

इंदौर : फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे मध्य प्रदेश विरुद्ध ७८ धावांनी पिछाडीवर पडलेल्या मुंबईने जबरदस्त पुनरागमन करताना दुसऱ्या डावात मध्य प्रदेशचा डाव २०१ धावांत संपुष्टात आणला. गोलंदाजांच्या या चमकदार कामगिरीमुळे मुंबईला विजयासाठी २८० धावांचे आव्हान मिळाले असून, सामन्याचे अजून दोन दिवस शिल्लक आहेत.
होळकर स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात यजमानांनी पाहुण्या मुंबईचा पहिला डाव १६२ धावांत गुंडाळून ७८ धावांची आघाडी घेतली. गोलंदाजांसाठी पूरक ठरलेल्या या खेळपट्टीवर मध्य प्रदेशने दुसऱ्या डावात २०१ धावांची मजल मारत मुंबईसमोर विजयासाठी २८० धावांचे आव्हान उभे केले. सामन्यावर राहिलेले गोलंदाजांचे वर्चस्व पाहता मुंबईकरांची विजयासाठी मोठी कसोटी लागणार आहे.
दुसऱ्या डावात यजमानांची सुरुवात अडखळती झाली. पहिल्याच षटकात विशाल दाभोळकरने सलामीवीर आदित्य श्रीवास्तवला बाद करून मध्य प्रदेशला धक्का दिला. जलज सक्सेना आणि हरप्रीत सिंग यांनी ४४ धावांची भागीदारी करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र हुकमी गोलंदाज शार्दुल ठाकूरने हरप्रीतला बाद करून ही जोडी फोडली. हरप्रीत ३९ चेंडूंत २२ धावा करून परतला. रमीझ खान, रजत पाटीदार आणि नमन ओझा हे फारशी चमक न दाखवता परतल्याने यजमानांचा डाव ५ बाद ११० धावा असा घसरला.
एका बाजूने टिकून राहिलेल्या सक्सेनाने देवेंद्र बुंदेलासह सहाव्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. या वेळी पुन्हा एकदा ठाकूरने आपली चमक दाखवताना सक्सेनाला माघारी परतवून मुंबईला मोठे यश मिळवून दिले. सक्सेनाने १५२ चेंडूंत ९ चौकारांसह सर्वाधिक ७९ धावा काढल्या. यानंतर ठरावीक अंतराने मुंबईने धक्के देत यजमानांचा डाव संपुष्टात आणला. कर्णधार बुंदेलाने संयमी ४२ धावांची खेळी केली. मुंबईकडून शार्दुल ठाकूर व इक्बाल अब्दुल्ला यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. तर विशाल दाभोळकरने २ बळी घेतले.
तत्पूर्वी ६ बाद ७४ या धावसंख्येवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या मुंबईचा डाव १६२ धावांत संपुष्टात आला. इक्बाल अब्दुल्ला (२१), शार्दुल ठाकूर (१८), विशाल दाभोळकर (१६) आणि अंकुश जैसवाल (नाबाद २०) या तळाच्या फलंदाजांनी केलेल्या प्रतिकारामुळे मुंबईने दीडशेचा पल्ला पार केला. मध्य प्रदेशच्या जलज सक्सेना आणि अंकित शर्मा या फिरकी जोडीने एकहाती वर्चस्व राखताना प्रत्येकी ५ बळी घेत मुंबईला गुंडाळण्यात निर्णायक कामगिरी केली.
धावफलक :
मध्य प्रदेश (पहिला डाव) : ७५.१ षटकांत सर्वबाद २४० धावा.
मुंबई (पहिला डाव) : अखिल हेरवाडकर त्रि. गो. अंकित शर्मा १७, जय बिस्त झे. श्रीवास्तव गो. सक्सेना २७, श्रेयश अय्यर झे. ओझा गो. सक्सेना १, सूर्यकुमार यादव पायचीत गो. सक्सेना २, आदित्य तरे झे. पाटीदार गो. शर्मा ०, सिद्धेश लाड त्रि. गो. शर्मा १३, निखिल पाटील त्रि. गो. अंकित १०, अब्दुल्ला पायचीत गो. अंकित २१, शार्दुल ठाकूर पायचीत गो. सक्सेना १८, विशाल दाभोळकर झे. श्रीवास्तव गो. सक्सेना १६, अंकुश जयस्वाल नाबाद २०. ३८.१ षटकांत सर्वबाद १६२ धावा.
गोलंदाजी : जलज सक्सेना १९.१-२-६६-५; अंकित शर्मा १९-३-८०-५.
मध्य प्रदेश (दुसरा डाव) : आदित्य श्रीवास्तव यष्टीचीत तरे गो. दाभोळकर ०, जलज सक्सेना झे. तरे गो. ठाकूर ७९, हरप्रीत सिंग झे. हेरवाडकर गो. ठाकूर २२, रमीझ खान झे. अय्यर गो. बिस्त ८, रजत पाटीदार पायचीत गो. अब्दुल्ला ९, नमन ओझा झे. अय्यर गो. अब्दुल्ला १७, देवेंद्र बुंदेला झे. तरे गो. दाभोळकर ४२, अंकित शर्मा झे. तरे गो. ठाकूर ०, एस. जैन पायचीत गो. जयस्वाल १३, ईश्वर पांड्ये त्रि. गो. अब्दुल्ला ३, मिहिर हिरवानी नाबाद ३. अवांतर - ५. एकूण : ७१.२ षटकांत सर्व बाद २०१ धावा.
गोलंदाजी : विशाल दाभोळकर १६.२-२-४२-२; अंकुश जयस्वाल
१३-१-३०-१; शार्दुल ठाकूर १४-३-३३-३; जय बिस्त ९-१-३८-१; इक्बाल अब्दुल्ला १९-५-५३-३.
कार्तिकची शतकी खेळी
पुणे : केबी वरुण कार्तिक (१०५), गोकूळ शर्मा (नाबाद ५९) यांच्या खेळीच्या बळावर आसामने महाराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात ४ बाद २२३ धावांची खेळी केली.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना सुरू आहे. सोमवारी पावसामुळे सामन्याचा पहिला दिवस वाया गेला. पल्लव दास (८), राहुल हजारिका (६), शिवशंकर रॉय (०) हे झटपट बाद झाले. समद फल्लाहने पल्लव दासला बाद केले. अनुपम संकलेचाने हझारिका व रॉयला तंबूत धाडले. अमित वर्माला (३२) फल्लाहने बाद करीत आणखी एक झटका दिला.
कार्तिकने २२५ चेंडूंत ११ चौकार व १ षटकाराच्या साहाय्याने नाबाद १०५, तर शर्माने १०३ चेंडूंत ५९ धावा करीत संघाची पडझड थांबवली.

Web Title: Chasing 280 for Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.