चंद्रपॉललाही सन्मानाने निवृत्ती घेण्याचा हक्क

By Admin | Updated: May 28, 2015 01:32 IST2015-05-28T01:32:44+5:302015-05-28T01:32:44+5:30

आपल्या काळातील दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने अनुभवी फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल याला कसोटी संघातून बाहेर काढणाऱ्या वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळावर जोरदार टीका केली आहे.

Chanderpaul also deserves the right to retire | चंद्रपॉललाही सन्मानाने निवृत्ती घेण्याचा हक्क

चंद्रपॉललाही सन्मानाने निवृत्ती घेण्याचा हक्क

पोर्ट आॅफ स्पेन : आपल्या काळातील दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने अनुभवी फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल याला कसोटी संघातून बाहेर काढणाऱ्या वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळावर जोरदार टीका केली आहे. बीसीसीआयने जशी सचिनला निवृत्ती घेण्याची संधी दिली होती, तशीच संधी गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त कालावधी खेळणाऱ्या डावखुऱ्या चंद्रपॉललाही द्यायला हवी, असे लाराने म्हटले आहे.
सलग सुमार कामगिरीमुळे आॅस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी चंद्रपॉलला निवडण्यात आले नाही. डब्ल्यूआयसीबीच्या या वागण्यामुळे संतप्त लाराने, त्यांनी भारतीय क्रिकेट मंडळाकडून शिकवण घ्यायला हवी. त्यांनी तेंडुलकरला निरोप देण्यासाठी २0१३ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिकेचे आयोजन केले होते, असे सांगितले.
चंद्रपॉलने १६४ कसोटी सामन्यांत ५१.३७ च्या सरासरीने ११ हजार ८६७ धावा केल्या. त्यात ३0 शतके आणि ६६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याला लाराचा ११,९५३ धावांचा विक्रम तोडण्यासाठी फक्त ८६ धावांची गरज होती.
चंद्रपॉलला बाहेर करण्यासाठी रेकॉर्डचे काही देणे-घेणे नसल्याचे लाराने म्हटले. तो म्हणाला, ‘‘या आकड्यांशी अथवा नंबरशी काहीही संबंध नाही. चंद्रपॉलला गेले ११ डाव रेकॉर्ड मोडण्यासाठी दिले होते हे त्यांचे म्हणणे आहे. तथापि, चंद्रपॉलला सन्मानाने निवृत्ती स्वीकारण्याचा अधिकार आहे. खरे पाहता त्याला त्याच्या अटीनुसार निवृत्ती घेण्याची संधी द्यायला हवी.’’
लाराने चंद्रपॉलला आॅस्ट्रेलियाविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात घेण्याची विनंती केली आणि ही मालिका त्याच्या निरोपाची मालिका म्हणून मानायला हवी, असे सांगितले.
तो म्हणाला, ‘‘या मालिकेत तो द्विशतक ठोको अथवा शून्यावर बाद होवो, हे जास्त महत्त्वाचे नाही आणि याचे कोणाला दु:खही होणार नाही. ही त्याची निरोपाची मालिका होईल आणि पूर्ण क्रिकेट जगताला हे माहीत होईल, याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. डब्ल्यूआयसीबी आणि कॅरेबियन हे शिवनारायणला सन्मानासह निरोप देण्यासाठी ऋणी आहेत आणि हा त्याने हक्क प्राप्त केला आहे.’’ (वृत्तसंस्था)

त्यांनी (बीसीसीआय) काय केले, त्यांनी सचिनच्या सन्मानार्थ एक कसोटी मालिका आयोजित केली आणि त्याचे योगदान पाहता त्याला शानदार निरोप दिला आणि येथे त्याने (चंद्रपॉल) आपले सर्व काही अर्पण केले आणि त्या बदल्यात आम्ही काय केले, तर त्याला संघाबाहेर केले.
- ब्रायन लारा

Web Title: Chanderpaul also deserves the right to retire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.