एफसी गोवाविरुद्ध कारवाईची शक्यता
By Admin | Updated: December 27, 2015 02:33 IST2015-12-27T02:33:34+5:302015-12-27T02:33:34+5:30
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची शिस्तपालन समिती पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत चेन्नईयन एफसीविरुद्धच्या अंतिम सामन्यात गैरवर्तन

एफसी गोवाविरुद्ध कारवाईची शक्यता
नवी दिल्ली : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची शिस्तपालन समिती पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत चेन्नईयन एफसीविरुद्धच्या अंतिम सामन्यात गैरवर्तन केल्यामुळे एफसी गोवा संघावर कारवाई करू शकते.
आयएसएलच्या फायनल लढतीत चेन्नईयन एफसीकडून २-३ गोलफरकाने पराभूत झालेल्या एफसी गोवा संघाने सामन्यादरम्यान गैरवर्तन केले होते. त्यामुळे एआयएफएफची शिस्तपालन समिती त्यांच्यावर कारवाई करू शकते. सामना आयुक्त ए. के. मामुकोया यांनी त्यांच्या अहवालात भारतीय फुटबॉल संघाला एफसी गोवाविरुद्ध कारवाई करण्यास सांगितले आहे. त्यांनी त्यांच्या अहवालात म्हटले, की तीन जपानी रेफ्रींना एफसी गोवाचा स्टाफ आणि खेळाडूंनी सामन्यादरम्यान धमकी दिली होती. आपल्या दोन पानांच्या अहवालात आयुक्तांनी सामन्याची फायनल शिटी वाजल्यानंतर एफसी गोवाचे काही खेळाडू आणि अधिकारी रेफ्रीजवळ आले आणि त्यांनी त्यांना घेराव घालून धमकावले, असे म्हटले आहे. खेळाडूंच्या या वर्तनामुळे आपल्याला जपानच्या रेफ्रींचा बचाव करावा लागला. खेळाडूंनी रेफ्रीविरुद्ध अपशब्दाचा उपयोग आणि धक्काबुक्की केल्याचे मामुकोया यांनी सांगितले. एफसी गोवाच्या पदाधिकाऱ्यांनी लॉकर रूममध्येदेखील रेफ्रींना धमकी दिली होती. तथापि, या पूर्ण वादादरम्यान आयएसएल चॅम्पियन चेन्नईयन एफसीचे वर्तन खूपच शांत आणि समजूतदारीपूर्ण होते.
असा दावाही आयुक्तांनी त्यांच्या अहवालात केला.
ते म्हणाले, ‘‘आपल्या दृष्टिकोनातून अखेरची शिटी वाजल्यानंतर एफसी गोवाचे गैरवर्तन अनावश्यक होते. हे वर्तन भयावह आणि दबाव निर्माण करणारे होते. हे सर्व खिलाडू वृत्तीच्या विरुद्ध होते. गोवा संघाने आपला पराभव मान्य करायला हवा होता आणि खेळाचा सन्मान करायला हवा होता. दुसरीकडे चेन्नईयन संघाचे वर्तन खूपच सन्मानजक होते आणि त्यांनी त्यांच्या विजयाचा जल्लोषही संयमाने साजरा केला. अशा वर्तनामुळे परदेशी खेळाडू भारतात येण्याआधी दोनदा विचार करतील, तसेच भारतीय फुटबॉलच्या प्रतिमेलाही धक्का बसला आहे.’’