नवख्या अफगाणिस्तानपुढे अनुभवी आॅस्ट्रेलियाचे आव्हान
By Admin | Updated: March 3, 2015 23:46 IST2015-03-03T23:46:32+5:302015-03-03T23:46:32+5:30
चार वेळा जेतेपदाचा मान मिळविणारा अनुभवी आॅस्ट्रेलिया संघ आणि नवखा अफगाणिस्तान संघ यांच्यादरम्यान विश्वकप क्रिकेट स्पर्धेत बुधवारी लढत होणार आहे.

नवख्या अफगाणिस्तानपुढे अनुभवी आॅस्ट्रेलियाचे आव्हान
पर्थ : चार वेळा जेतेपदाचा मान मिळविणारा अनुभवी आॅस्ट्रेलिया संघ आणि नवखा अफगाणिस्तान संघ यांच्यादरम्यान विश्वकप क्रिकेट स्पर्धेत बुधवारी लढत होणार आहे.
युद्धजन्य परिस्थितीत विश्वकप स्पर्धेसाठी पात्रता मिळविणाऱ्या अफगाण संघाची वाटचाल परिकथेप्रमाणे आहे. अफगाणिस्तान संघाने यापूर्वीच्या सामन्यात स्कॉटलंडचा पराभव करीत आपल्या चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी प्रदान केली.
वेगवान गोलंदाजांना अनुकूल वाकाच्या खेळपट्टीचा अफगाणिस्तान संघाला अनुभव नाही. याचा लाभ घेण्यास आॅस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन व मिशेल स्टार्क उत्सुक आहेत. भारताविरुद्ध वाकाच्या खेळपट्टीवर संयुक्त अरब अमिरात संघ १०२ धावांत गारद झाला होता. वाकावर खेळणे आव्हान ठरणार असल्याचे मत अफगाणिस्तान संघाचा कर्णधार मोहम्मद नबीने व्यक्त केले आहे.
नबी म्हणाला, ‘‘सुरक्षेच्या कारणास्तव संयुक्त अरब अमिरात आमच्यासाठी गृहमैदानाप्रमाणे आहे, याची सर्वांना कल्पना आहे. तेथील खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी अनुकूल असतात. त्या तुलनेत आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल असतात.’’
अफगाणिस्तान संघाने विश्वकप स्पर्धेतील एका सामन्यात श्रीलंकेची ४ बाद ५१ अशी अवस्था केली होती. स्कॉटलंडविरुद्ध अष्टपैलू कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज हामिद हसन व शपूर जदरान कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहेत. ९६ धावांची खेळी करणारा समिउल्ला शेनवारी पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यास सज्ज आहे.
स्कॉटलंडचा पराभव करण्यापूर्वी बांगलादेश व श्रीलंकेविरुद्ध पराभव स्वीकारणारा अफगाणिस्तान संघ बाद फेरी गाठण्याच्या शर्यतीत आहे. आॅस्ट्रेलियाचा पराभव करणे अफगाणिस्तान संघासाठी दिवास्वप्न आहे, पण असे जर घडले, तर वर्तमान क्रिकेटमधील तो सर्वांत मोठा उलटफेर ठरेल. आॅस्ट्रेलियाला या लढतीत मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. पहिल्या लढतीत इंग्लंडचा पराभव करणाऱ्या आॅस्ट्रेलिया संघाची बांगलादेशविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाली. गेल्या लढतीत आॅस्ट्रेलिया संघाला न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स फिटनेसच्या कारणास्तव या लढतीला मुकणार आहे. त्याच्या स्थानी
जोश हेजलवुडला संधी मिळण्याची आशा आहे. (वृत्तसंस्था)
हेड टू हेड
आॅस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये आत्तापर्यंत एकच सामना झाला आहे.
हा सामना आॅस्ट्रेलियाने जिंकला आहे.
आॅस्ट्रेलिया : मायकल क्लार्क (कर्णधार), जॉर्ज बेली (उपकर्णधार), पॅट क्युमिन्स, झेव्हिएर डोहर्टी, जेम्स फॉल्कनर, अॅरोन फिंच, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), जोश हेजलवुड, मिचेल जॉन्सन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हीड वॉर्नर, शेन वॉटसन.
अफगाणिस्तान : मोहम्मद नाबी (कर्णधार), अफसार जाजाई (यष्टीरक्षक), आफ्ताब आलम, असघर स्तानिक्झाई, दवलत जद्रान, गुलबादीन नैब, हामिद हसन, जावेद अहमदी, मिरवैस अर्शफ, नाजीबुल्लाह जद्रान, नासीर जमाल, नवरोज मंगल, सॅमिउल्लाह शेनवारी, शपूर जद्रान, उसमान घानी, हशमातुल्लाह शाइदी, इजातुल्लाह दवलतजाई, शाफिकउल्लाह, शराफुद्दीन अशराफ