चॅलेंजर्सचा ‘रॉयल’ विजय

By Admin | Updated: May 3, 2015 00:05 IST2015-05-03T00:05:33+5:302015-05-03T00:05:33+5:30

युवा फलंदाज मनदीपसिंग याने १८ चेंडूंत नाबाद ४५ धावांचा झंझावात करीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएल-

Challengers' Royal Victory | चॅलेंजर्सचा ‘रॉयल’ विजय

चॅलेंजर्सचा ‘रॉयल’ विजय

बेंगळुरु : युवा फलंदाज मनदीपसिंग याने १८ चेंडूंत नाबाद ४५ धावांचा झंझावात करीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएल-८ मध्ये शनिवारी ७ गड्यांनी विजय मिळवून दिला. पावणेतीन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे हा सामना प्रत्येकी दहा षटकांचा खेळविण्यात आला. त्यात घरच्या मैदानावर विजय मिळवून आरसीबीने विजयी पथावर येण्याचा प्रयत्न केला.
केकेआरने आधी फलंदाजीचे आमंत्रण मिळताच दहा षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात १११ पर्यंत मजल गाठली. आंद्रे रसेल याने त्यात ४५ धावांचे योगदान दिले. लक्ष्य गाठणाऱ्या आरसीबीची फलंदाजी रोमहर्षक होती. पण अखेरीस मनदीपने उमेश यादवच्या चेंडूवर सलग दोन चौकार व त्यानंतर रसेलला दोन षटकार खेचून विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने एकूण ४ चौकार व ३ षटकार मारले. आरसीबीने विजयी लक्ष्य ९.४ षटकांत ११५ धावा करीत गाठले. कर्णधार विराट कोहलीने ३४ धावा केल्या.
आरसीबीचा हा आठ सामन्यांतील चौथा विजय आहे. गुणतालिकेत हा संघ तिसऱ्या स्थानावर आला. केकेआरचा ९ सामन्यांतील चौथा पराभव ठरला. कोहली- गेल यांनी जलद सुरुवात केली. कोहलीने यादव आणि कमिन्सला उत्तुंग फटके मारून मनसुबे जाहीर केले. केकेआरच्या मागच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला
फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉग याला
गेलने दोन षटकार खेचले. तो
तिसरा षटकार मारणार तोच रसेलने त्याचा उत्कृष्ट झेल टिपला. पीयूष चावलाने एबी डिव्हिलियर्सला (२)जाळ्यात ओढताच आरसीबीच्या तंबूत खळबळ माजली होती. पण मनदीपने न डगमगता विजयी लक्ष्य गाठून दिले.
त्याआधी आरसीबीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पण त्यानंतर लगेच मुसळधार पावसाने हजेरी लावताच २ तास ४५ मिनिटांचा खेळ वाया गेला. यामुळे प्रत्येकी दहा षटकांचा सामना खेळविण्याचा निर्णय पंचांना घ्यावा लागला.
फॉर्ममध्ये असलेल्या आंद्रे रसेलच्या झंझावाती खेळीच्या बळावर केकेआरने पावसाच्या व्यत्ययात दहा षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात १११ धावा उभारल्या. रसेलने ४५ धावा ठोकल्या. रसेलने केवळ १७ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकार ठोकले. त्याच्याशिवाय केकेआरचा
कुणीही फलंदाज परिस्थितीची गरज ओळखून दीर्घवेळ खेळपट्टीवर स्थिरावू शकला नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: Challengers' Royal Victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.