मालिका वाचविण्याचे आव्हान

By Admin | Updated: October 22, 2015 01:08 IST2015-10-22T01:08:53+5:302015-10-22T01:08:53+5:30

द.आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत कामगिरीमध्ये सातत्य राखण्यात अपयशी ठरलेल्या टीम इंडियासाठी फलंदाजी डोकेदुखी ठरली आहे. योग्य फलंदाजी संयोजनाअभावी

Challenge to save series | मालिका वाचविण्याचे आव्हान

मालिका वाचविण्याचे आव्हान

चेन्नई : द.आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत कामगिरीमध्ये सातत्य राखण्यात अपयशी ठरलेल्या टीम इंडियासाठी फलंदाजी डोकेदुखी ठरली आहे. योग्य फलंदाजी संयोजनाअभावी १-२ ने माघारल्यामुळे गुरुवारी खेळल्या जाणाऱ्या चौथ्या सामन्यात विजय मिळवून, मालिकेत बरोबरी साधण्याचे अवघड आव्हान धोनी सेनेपुढे असेल.
विजयासाठी नमके कुठले फलंदाजी संयोजन भारतीय संघाला विजयी रुळावर आणू शकते, याचा शोध घेण्यात संघव्यवस्थापन व्यस्त आहे. द. आफ्रिकेविरुद्ध विजय न मिळाल्यास, बांगला देशपाठोपाठ सलग दुसरी मालिका गमविण्याची वेळ भारतावर येईल. धोनीची समस्या केवळ फलंदाजीपुरती मर्यादित नसून, रविचंद्रन अश्विनची अनुपस्थिती, अमित मिश्रावर लागलेले आरोप व त्याच्या खेळण्याविषयी असलेली शंका या नव्या समस्यांची भर पडली. टीम इंडिया कधी काळी विजयाचा पाठलाग करण्यात तरबेज मानली जायची, पण आता ही समस्या ठरते आहे. पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर आदर्श फलंदाज कोण, याचा शोध लागलेला नाही. या तिन्ही स्थानावर खेळणारे खेळाडू ‘फिनिशर’ ठरू शकतात.
तिसऱ्या स्थानावर विराट कोहली धावा काढू शकला, पण पाचव्या स्थानावर खेळणारा अजिंक्य रहाणे अद्याप ‘फिट’बसू शकला नाही. पहिल्या दोन सामन्यात अर्धशतके नोंदविणारा अजिंक्य मागच्या सामन्यात फ्लॉप झाला. रैनाचे अपयश फार मोठे आहे. तीन सामन्यांत त्याने केवळ तीन धावांचे योगदान दिले. रैनाच्या अपयशाचा फटका अन्य फलंदाजांना बसला. रोहित शर्मा धावा काढत आहे, पण दुसरा सलामीवीर शिखर धवन तीन सामन्यात ५९ धावांपर्यंतच मर्यादित राहिला.अशा वेळी धोनी उद्या फलंदाजीचे संयोजन कसे करतो, हे पाहावे लागेल. धोनी स्वत: चौथ्या स्थानावर खेळतो. त्याने १७३ धावा केल्या, पण फलंदाजीत सातत्य मुळीच नव्हते.
गोलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास भुवनेश्वर सुरुवातीला आणि हरभजन मधल्या टप्प्यात मारा कसा करतो, यावर
बरेच विसंबून असेल. द. आफ्रिकेचे खेळाडूदेखील जखमांनी त्रस्त आहेत. मोर्नोे मोर्केलच्या पायाला दुखापत असून, तो उद्याच्या सामन्यात खेळण्याची शक्यता क्षीण आहे.
निर्णायक क्षणी प्रभावी ठरणारा जेपी ड्युमिनी हा हाताच्या जखमेमुळे तीन आठवडे संघाबाहेर झाला. त्याचे स्थान डीन एल्गरने घेतले.
या संघाला फलंदाजीतही संमिश्र यश लाभले. कर्णधार डिव्हिलियर्सने एक शतक ठोकले, तर डुप्लेसिसने तिन्ही सामन्यात अर्धशतकी खेळी केली आहे. क्वीटंन डिकॉकने मागच्या सामन्यात शतकी खेळीसह फॉर्ममध्ये परतल्याची झलक दाखविली. हाशीम अमला याची चिंता मात्र कायम आहे. आतापर्यंत लौकिकानुसार खेळ करण्यात अपयशी ठरल्याने त्याच्याकडून मोठ्या खेळीची संघाला अपेक्षा आहे. (वृत्तसंस्था)

अमित मिश्रा आज खेळणार : हरभजन
लेग स्पिनर अमित मिश्रा हा द. आफ्रिकेविरुद्ध आज गुरुवारी होणाऱ्या चौथ्या वन डे साठी उपलब्ध राहील. त्याची निवड मात्र चेपॉकच्या खेळपट्टीच्या स्थितीवर अवलंबून असेल, असे आॅफ स्पिनर हरभजनसिंग याने सांगितले.
बेंगळुरू येथे एका महिलेने अमित मिश्राविरुद्ध विनयभंगाची तक्रार नोंदविली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मिश्राच्या खेळण्यावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे भज्जीने स्पष्ट केले.
तो म्हणाला,‘मिश्रा सामन्यासाठी सज्ज आहे. त्याला या खेळपट्टीवर संधी द्यावी, असे व्यवस्थापनाला वाटल्यास तो अंतिम अकरामध्ये खेळेल. कानपूर व राजकोट येथे खेळलेल्या मिश्राला स्वत:ची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात उपस्थित राहायचे आहे.’
अश्विनच्या फिटनेसविषयी माहिती नसल्याचे सांगून त्याचे फिट होणे संघाच्या हिताचे असेल, असे भज्जीने सांगितले. अश्विनबद्दल घाई नको. तो दीर्घकाळ फिट राहावा यावर भर दिला जात आहे. अश्विन मॅचविनर असल्याने फिट झाल्यास तो खेळेलच.

भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, अक्षर पटेल, हरभजनसिंग, अमित मिश्रा, मोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, एस अरविंद, स्टुअर्ट बिन्नी, अंबाती रायुडू आणि गुरकीरत मान.

दक्षिण आफ्रिका : एबी डिव्हिलियर्स (कर्णधार), हाशिम अमला, क्वींटन डिकॉक, फाफडु प्लेसिस, डीन एल्गर, डेव्हिड मिलर, फरहान बेहारडीन, ख्रिस मॉरिस, खाया जोंडो, अ‍ॅरोन फॅगिन्सो, इम्रान ताहिर, डेल स्टेन, मोर्ने मोर्केल, काइल एबोट आणि कॅगिसो रबाडा.

सामन्याची वेळ : दुपारी १.३० पासून

Web Title: Challenge to save series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.