दिल्लीपुढे कामगिरी सुधारण्याचे आव्हान

By Admin | Updated: April 19, 2017 01:50 IST2017-04-19T01:50:46+5:302017-04-19T01:50:46+5:30

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला गतविजेत्या सनरायजर्स हैदराबादच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

Challenge to improve performance ahead of Delhi | दिल्लीपुढे कामगिरी सुधारण्याचे आव्हान

दिल्लीपुढे कामगिरी सुधारण्याचे आव्हान

हैदराबाद : दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला आयपीएलच्या दहाव्या पर्वात आज, बुधवारी गतविजेत्या सनरायजर्स हैदराबादच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सला विजयी मार्गावर पतरण्यासाठी फलंदाजीमध्ये सुधारणा करावी लागणार आहे.
दिल्ली संघासाठी हे काम सोपे नाही कारण सनरायजर्स संघात आॅरेंज कॅपचा मानकरी डेव्हिड वॉर्नर (२३५ धावा) आणि पर्पल कॅपचा मानकरी भुवनेश्वर कुमार (१५ विकेट) यांचा समावेश आहे.
गेल्या लढतीत सनरायजर्सने किंग्स इलेव्हन पंजाबचा अखेरच्या षटकामध्ये पराभव केला तर दिल्लीला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. सनरायजर्सने पाच सामन्यांत सहा गुणांची कमाई केली असून गुणतालिकेत हा संघ तिसऱ्या स्थानी आहे तर दिल्ली संघ चार गुणांसह चौथ्या स्थानी आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला आतापर्यंत फलंदाजांनी निराश केले आहे. आरसीबी व केकेआरविरुद्धच्या दोन लढतींमध्ये सुरुवातीला व शेवटी त्यांच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, पण मधल्या षटकांतील अपयशामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)
दिल्ली संघात संजू सॅमसन, सॅम बिलिंग्स, रिषभ पंत, कोरे अँडरसन व ख्रिस मॉरिस यांच्यासारख्या फलंदाजांचा समावेश आहे. सॅमसनने आयपीएलच्या दहाव्या पर्वात पहिले शतक झळकावले आहे, पण त्यानंतर त्याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. उप्पलच्या संथ खेळपट्टीवर फॉर्मात असलेला भुवनेश्वर आणि अफगाणिस्तानच्या राशिद खानच्या गोलंदाजीला सामोरे जाणे आव्हान आहे. फॉर्मात नसलेल्या अँजेल मॅथ्यूजला खेळविण्यात येते किंवा नाही, याबाबत उत्सुकता आहे.
दिल्ली संघाची गोलंदाजीची भिस्त झहीर खान, मॉरिस, शाहबाज नदीम व पॅट कमिन्स यांच्या व्यतिरिक्त अँडरसन व अमित मिश्रा यांच्यावर अवलंबून आहे. या सर्वांपुढे वॉर्नरला रोखण्याचे आव्हान राहणार आहे.
हैदराबादतर्फे बरिंदर सरणच्या स्थानी आशीष नेहराला संधी मिळू शकते. पहिल्या लढतीत चमकदार कामगिरी करणाऱ्या युवराजकडून संघाला चमकदार कामगिरीची आशा आहे. त्याची साथ देण्यासाठी मोइजेस हेन्रिक्स व बेन कटिंग आहेत. (वृत्तसंस्था)

प्रतिस्पर्धी संघ
सनरायजर्स हैदराबाद : डेविड वॉर्नर (कर्णधार), तन्मय अग्रवाल, रिकी भुई, बिपुल शर्मा, बेन कटिंग, शिखर धवन, एकलव्य द्विवेदी, मोइजेस हेन्रिक्स, दीपक हुड्डा, ख्रिस जॉर्डन, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, बेन लागलिन, अभिमन्यू मिथुन, मोहम्मद नबी, मोहम्मद सिराज, मुस्ताफिजूर रहमान, आशीष नेहरा, नमन ओझा, राशिद खान, विजय शंकर, बरिंदर सरन, प्रवीण तांबे, केन विलियम्सन, युवराज सिंग.
दिल्ली डेअरडेविल्स : झहीर खान (कर्णधार), मोहम्मद शमी, शाहबाज नदीम, जयंत यादव, अमित मिश्रा, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, करुण नायर, रिषभ पंत, सीवी मिलिंद, खलील अहमद, प्रत्युष सिंग, मुरुगन अश्विन, आदित्य तारे, शशांक सिंग, अंकित बवाने, नवदीप सैनी, कोरे अँडरसन, अँजेलो मॅथ्यूज, पॅट कमिंस, कागिसो रबाडा, ख्रिस मॉरिस, कार्लोस ब्रेथवेट आणि सॅम बिलिंग्स.

Web Title: Challenge to improve performance ahead of Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.