कोलंबियाला रोखण्याचे ब्राझीलपुढे आव्हान
By Admin | Updated: July 4, 2014 06:03 IST2014-07-04T06:03:13+5:302014-07-04T06:03:13+5:30
फिफा विश्वचषक स्पर्धेत पाचवेळा जेतेपदाचा मान मिळविणाऱ्या ब्राझील संघाला यावेळी अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

कोलंबियाला रोखण्याचे ब्राझीलपुढे आव्हान
फोर्टेलेजा : फिफा विश्वचषक स्पर्धेत पाचवेळा जेतेपदाचा मान मिळविणाऱ्या ब्राझील संघाला यावेळी अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कोलंबियाविरुद्ध उद्या, शुक्रवारी खेळल्या जाणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत ब्राझील संघ प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. कोलंबिया संघाची या स्पर्धेतील कामगिरी उल्लेखनीय ठरली असून, त्यांनी प्रथमच फिफा विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे.
ब्राझील संघाला या स्पर्धेत अपेक्षित सुरुवात करता आलेली नाही. त्यांना दोन सामन्यांत बरोबरीवर समाधान मानावे लागले. चिली विरुद्ध उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत ब्राझीलने पेनल्टी शुटआऊटमध्ये बाजी मारली. साखळी फेरीत त्यांना मेक्सिकोविरुद्ध गोलशून्यने बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यांना या स्पर्धेत क्रोएशिया व कॅमरून विरुद्ध निर्णायक विजय मिळविता आला.
कोलंबिया संघाने चारही सामने जिंकलेले आहेत. साखळी फेरीत कोलंबियाने ग्रीस, आयव्हरी कोस्ट व जपान संघांचा सहज पराभव केला, तर उपउपांत्यपूर्व फेरीत त्यांनी उरुग्वेच्या बलाढ्य संघाविरुद्ध २-० ने सरशी साधली. कोलंबिया संघाच्या यशात जेम्स रोड्रिग्जची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. या २२ वर्षीय खेळाडूने आतापर्यंत या स्पर्धेत पाच गोल नोंदविले असून, गोल्डन बूटच्या शर्यतीत सर्वांत आघाडीवर आहे.
ब्राझील व कोलंबिया लढतीच्या निमित्ताने जगातील दोन अव्वल युवा स्ट्रायकर रोड्रिग्ज व नेमार यांच्या दरम्यान चुरस अनुभवायला मिळणार आहे. नेमारने आतापर्यंत या स्पर्धेत चार गोल नोंदविलेले आहेत. ब्राझील संघ सहाव्यांदा विश्वचषक पटकाविण्यास प्रयत्नशील आहे. ब्राझील संघ लक्ष्य गाठण्यास, तर कोलंबिया कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. त्यामुळे उभय संघांदरम्यान उद्या खेळल्या जाणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळणार आहे.
ब्राझीलच्या सुपरस्टार नेमारने प्रतिस्पर्धी संघाला इशारा दिला आहे. ब्राझीलचे प्रशिक्षक लुईस फिलिप स्कोलरी यांनी या स्पर्धेत काही प्रयोग केले आहेत. प्रशिक्षकांनी सोपविलेली जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे नेमारने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
ब्राझीलच्या बचावपटूंपुढे कोलंबियाच्या आघाडीच्या फळीतील खेळाडूंना रोखण्याचे आव्हान राहणार आहे. कोलंबियाने या स्पर्धेत ११ गोल नोंदविले आहेत. कोंलबियाचा बचावही चांगला असून, त्यांच्याविरुद्ध या स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघांना केवळ दोनदा गोलजाळ्याचा वेध घेता आला. रोड्रिग्ज संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सज्ज आहे.
रोड्रिग्ज म्हणाला, ‘आम्ही इतिहास घडविण्यास सज्ज असल्यामुळे आनंदी आहोत. आम्ही सर्वोत्तम कामगिरी करण्यास प्रयत्नशील असून विजय मिळविण्याचे लक्ष्य आहे. या लढतीत विजयासाठी ब्राझीलला पसंती दर्शविण्यात येत आहे. उभय संघांदरम्यानच्या लढतीत ब्राझील संघाचे पारडे वरचढ ठरलेले आहे. उभय संघांदरम्यान यापूर्वी २५ लढती खेळल्या गेलेल्या असून, ब्राझीलने १५ सामन्यांत बाजी मारली आहे. कोलंबिया संघाला केवळ दोनदा विजयाची चव चाखता आली, तर ८ सामने अनिर्णित संपले. कोलंबियाने ब्राझीलविरुद्ध अखेरचा विजय १९९१ च्या कोपा अमेरिका चषक स्पर्धेत मिळविला होता. त्यानंतर अलीकडच्या कालवधितील चारही सामने अनिर्र्णित संपले. त्यात २०१२ मध्ये न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या मैत्रीपूर्ण सामन्याचाही समावेश आहे. ब्राझीलने सलग सहाव्यांदा विश्वकप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे, पण गेल्या दोन स्पर्धांमध्ये त्यांना यापुढे मजल मारता आलेली नाही. (वृत्तसंस्था)