सीसीआय उपांत्य फेरीत
By Admin | Updated: June 14, 2015 01:51 IST2015-06-14T01:51:52+5:302015-06-14T01:51:52+5:30
गोरेगाव स्पोटर््स क्लब आणि यजमान सीसीआय या बलाढ्य संघांनी आपआपल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवताना महिलांच्या उल्लाल चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

सीसीआय उपांत्य फेरीत
मुंबई : गोरेगाव स्पोटर््स क्लब आणि यजमान सीसीआय या बलाढ्य संघांनी आपआपल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवताना महिलांच्या उल्लाल चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत कल्पिता सावंत - संजना संतोष या जोडीने एकतर्फी झालेल्या दुहेरी लढतीत पूजा मर्चंट - अनिश मिरचंदानी यांचा २१-६, २१-५ असा धुव्वा उडवून गोरेगाव एससीला पीजे हिंदू जिमखाना विरुद्ध १-० असे आघाडीवर नेले. यानंतर झालेल्या एकेरीच्या सामन्यात गोरेगावच्या शाझीया खानने आक्रमक खेळाच्या जोरावर पीजे हिंदू संघाच्या रज्वी संपतचा २१-११, २१-१६ असा पराभव करुन संघाला उपांत्य फेरीत नेले.
सीसीआय संघाने देखील व्हीपीएमएस विरुध्द अपेक्षित विजय मिळवताना दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या दुहेरी लढतीत यजमानांच्या करीना मदन - वैष्णवी अय्यर यांनी धडाकेबाज विजय मिळवताना ऐश्वर्या - अपेक्षा गिरप यांचा २१-१, २१-१५ असा पाडाव केला. यानंतर रिया आरोलकरने अनघा करंदकरचा २१-३, २१-६ असा फडशा पाडून सीसीआयच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
अन्य एका लढतीत एमएलडब्ल्यूबी आणि खार जिमखाना या संघांनी देखील सहज विजय मिळवताना स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. एमएलडब्ल्यूबी संघाने अनपेक्षित बाजी मारताना बॉम्बे जिमखानाचे आव्हान २-० असे संपुष्टात आणले. तर खार जिमखानाने देखील २-० असा विजय
मिळवताना अनुभवी एनएससीआयचे आव्हान संपुष्टात आणले.
(क्रीडा प्रतिनिधी)