लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जागतिक फुटबॉल क्रमवारीमध्ये भारताने अव्वल १०० स्थानांमध्ये प्रवेश केला हे भारतीय फुटबॉलसाठी मोठे यश आहे; परंतु अव्वल ५० स्थानांमध्ये प्रवेश केल्यानंतरच आनंद साजरा करेन, असे अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले. भारतात आयोजित होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने १६ वर्षांखालील मुलांना फुटबॉल खेळण्यास प्रवृत्त करण्यासाठी ‘जस्ट प्ले’ उपक्रमाची घोषणा करण्यात आली. फुटबॉल फेडरेशन आॅफ आॅस्टे्रलियाच्या (एफएफए) सहकार्याने आयोजित या उपक्रमाची घोषणा करताना यावेळी युएफा प्रशासन प्रमुख सीरिल पेल्लेवट, एफएफएच्या संचालिका मोया डॉड आणि मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे (एमडीएफए) चेअरमन आदित्य ठाकरे यांचीही उपस्थिती होती.पटेल पुढे म्हणाले की, ‘भारतीय संघाने केलेल्या प्रगतीचा आनंद असून सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांचे मी अभिनंदन करतो; परंतु अव्वल ५०मध्ये आल्यानंतरच मी याचा आनंद साजरा करेन.’जागतिक मानांकनात आणखी सुधारणा करण्याबाबत पटेल म्हणाले की, ‘मानांकन सुधारण्यासाठी आम्ही नक्कीच जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय मैत्री सामने खेळू. त्याशिवाय मानांकन उंचावणार नाही. कारण आपल्याहून वरच्या मानांकनाच्या संघाविरुध्द जिंकल्यास संघाचा आत्मविश्वास वाढेल व मानांकनही उंचावेल.’ त्याचप्रमाणे, ‘युवा खेळाडू भारतीय फुटबॉलचे भविष्य आहे. आज १७ वर्षांखालील संघाला जो काही पाठिंबा मिळत आहे तो सर्वोत्तम आहे. त्यांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असून भविष्यात भारतीय फुटबॉल नक्कीच उंची गाठेल,’ असा विश्वासही पटेल यांनी यावेळी व्यक्त केला.
टॉप-५०मध्ये आल्यावरच आनंदोत्सव : पटेल
By admin | Updated: May 6, 2017 00:44 IST