प्रशांत, अपूर्वा यांचा विश्वविजेतेपदावर कब्जा
By Admin | Updated: November 17, 2016 03:33 IST2016-11-17T03:33:03+5:302016-11-17T03:33:03+5:30
बर्मिंगहॅम येथील बादशाह पॅलेस येथे झालेल्या ७ व्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत बलाढ्य भारताने अपेक्षित वर्चस्व राखताना

प्रशांत, अपूर्वा यांचा विश्वविजेतेपदावर कब्जा
मुंबई : बर्मिंगहॅम येथील बादशाह पॅलेस येथे झालेल्या ७ व्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत बलाढ्य भारताने अपेक्षित वर्चस्व राखताना, ५ सुवर्ण, ५ रौप्य आणि २ कांस्य अशी एकूण १२ पदकांची लयलूट केली. पुरुष आणि महिला एकेरीची अंतिम फेरी भारतीय खेळाडूंमध्येच झाली. पुरुषांमध्ये महाराष्ट्राच्या प्रशांत मोरेने, तर महिलांमध्ये एस.अपूर्वाने विश्वविजेतेपदावर नाव कोरले.
प्रशांतने अंतिम सामन्यात झुंजार खेळ करताना, तीन गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत कसलेल्या रियाझ अकबर अलीला २५-२२, १०-२५, २५-१२ असा धक्का दिला, तसेच तृतीय क्रमांकासाठी झालेल्या लढतीत योगेश परदेशीने भारताच्याच आर. एम. शंकराला १४-१२, १३-१२ असे नमवून कांस्य पटकावले.
महिलांमध्ये, माजी विश्वविजेत्या असलेल्या अपूर्वाने पहिला गेम गमावल्यानंतर, जबरदस्त पुनरागमन करत, एम. परिमलादेवीचे कडवे आव्हान २०-२५, २५-१०, २५-१५ असे परतावून बाजी मारली. अपूर्वाचे हे दुसरे विश्वविजेतेपद ठरले, तर भारताच्या रश्मी कुमारीने श्रीलंकेच्या चलानी लकमलीला २५-७, २५-१ असे सहजपणे नमवून कांस्य पटकावले.
पुरुषांच्या दुहेरी गटातील अंतिम सामन्यात भारताच्या संदीप देवरुखकर व रियाझ अकबर अली जोडीने भारताच्याच आर.एम. शंकरा व प्रशांत मोरे जोडीचा १३-२५, २३-१२, २५-१३ असा पराभव केला. महिला दुहेरीत एस. अपूर्वा व काजल कुमारी जोडीने भारताच्याच एम. परिमलदेवी व तुबा सेहर जोडीला २५-१४, २५-१६ असे नमवून सुवर्ण पदकावर कब्जा केला. (क्रीडा प्रतिनिधी)