तिकीट तपासनीस ते महिला हॉकी संघाची कर्णधार
By Admin | Updated: July 17, 2016 13:54 IST2016-07-17T13:54:48+5:302016-07-17T13:54:48+5:30
३६ वर्षानंतर भारताचा महिला हॉकी संघ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला असून, सुशीला चानू या संघाचे नेतृत्व करत आहे.

तिकीट तपासनीस ते महिला हॉकी संघाची कर्णधार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - ३६ वर्षानंतर भारताचा महिला हॉकी संघ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला असून, सुशीला चानू या संघाचे नेतृत्व करत आहे. मणिपूरसारख्या छोटयाशा राज्यातून हॉकी करीयरची सुरुवात करणा-या सुशीलाचा ऑलिम्पिक पर्यंतचा प्रवास खरोखरचा दुस-यांना प्रेरणा देणारा आहे.
फार कमी जणांना माहिती असेल सुशीला मुंबईमध्ये ज्यूनियर तिकीट तपासनीस म्हणून काम करायची. ११२ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या सुशीलाच्या नेतृत्वाखाली भारताच्या महिला हॉकी संघाने २०१३ साली ज्यूनियर वर्ल्ड कप स्पर्धेत कास्यपदक मिळवले होते.
रितू रानीचा खराब फॉर्म आणि वर्तणूकीमुळे हॉकी इंडियाने सुशीला चानूची ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कर्णधार म्हणून निवड केली आहे. चानूने २००३ साली मणिपूरमधल्या हॉकी अॅकेडमीमध्ये हॉकी खेळायला सुरुवात केली. २००८ मध्ये तिने राष्ट्रीय संघात स्थान मिळवले.