कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविणार
By Admin | Updated: November 3, 2015 03:55 IST2015-11-03T03:55:40+5:302015-11-03T03:55:40+5:30
कर्णधार विराट कोहलीकडून मला मोठा पाठिंबा मिळत आहे. हे केवळ माझ्याबाबतीत नसून संघातील प्रत्येक खेळाडूला त्याचा पाठिंबा मिळतो. त्यामुळे त्याने जो विश्वास माझ्यावर

कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविणार
नवी दिल्ली : कर्णधार विराट कोहलीकडून मला मोठा पाठिंबा मिळत आहे. हे केवळ माझ्याबाबतीत नसून संघातील प्रत्येक खेळाडूला त्याचा पाठिंबा मिळतो. त्यामुळे त्याने जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे, तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी उत्सुक आहे, असे भारताचा वेगवान गोलंदाज वरुण अॅरोन याने सांगितले.
आॅक्टोबर २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या अॅरोनला आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले. मात्र, आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत नव्याने सुरुवात करताना कर्णधाराने जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ ठरविण्याचा निर्धार अॅरोनने केला आहे.
कर्णधाराचा पाठिंबा कायम चमकदार असतो. विराटचा संघातील प्रत्येक खेळाडूवर विश्वास आहे. कर्णधाराने जो विश्वास दाखवला आहे, त्यामुळे माझ्या आत्मविश्वासात वाढ झाली असून, येणाऱ्या द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत मी कर्णधाराचा विश्वास नक्कीच सार्थ ठरवेल, असे अॅरोनने सांगितले. आफ्रिकेचा एबी डिव्हीलियर्स सध्या तुफान फॉर्ममध्ये असून, कर्णधार हाशिम आमलाही कोणत्याही वेळेत फॉर्ममध्ये येऊ शकतो. त्यामुळे अशा कसलेल्या फलंदाजांसमोर मारा करण्याचे दडपण असेल का? यावर अॅरोन म्हणाला की, प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मी कोणतीही विशेष तयारी करीत नाहीए. याउलट माझा भर माझा पाया भक्कम करण्यावर आहे. कारण ही गोष्ट माझ्या नियंत्रणात असून हे साध्य झाल्यास मी नक्की यशस्वी होईल, याची खात्री आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी महत्त्वाची असून, सध्या याकडेच माझे पूर्ण लक्ष असल्याचे अॅरोनने सांगितले.(वृत्तसंस्था)
आगामी द. आफ्रिकाविरुद्ध मालिकेसाठी मी उत्सुक आहे. श्रीलंकेविरुद्ध मी केवळ एक सामना खेळलो आणि हा सामना चांगला झाला नाही. त्या सामन्यात केवळ दोन बळी घेण्यात यश आले. सध्या रणजी स्पर्धेत चांगली कामगिरी करीत असून बांगलादेशविरुद्ध भारत ‘अ’कडूनही माझी कामगिरी चांगली झाली. त्यामुळेच माझा आत्मविश्वास वाढला आहे.- वरुण अॅरोन