कोलकाताचा ‘सूर्य’ तळपला
By Admin | Updated: April 9, 2015 01:17 IST2015-04-09T01:17:14+5:302015-04-09T01:17:14+5:30
आयपीएलचा थरार काय असतो हे पहिल्याच सामन्यात पाहायला मिळाले. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात यजमान कोलकाता

कोलकाताचा ‘सूर्य’ तळपला
कोलकाता : आयपीएलचा थरार काय असतो हे पहिल्याच सामन्यात पाहायला मिळाले. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात यजमान कोलकाता नाइट रायडर्सने बलाढ्य मुंबई इंडियन्सचे तगडे आव्हान ७ विकेट्सने परतावले. विशेष म्हणजे मुंबईकर सुर्यकुमार यादवने अखेरपर्यंत फटकेबाजी करताना कोलकाताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. कर्णधार गौतम गंभीरने ४३ चेंडूत ५७ धावांचा तडाखा देताना संघाच्या विजयाचा पाया रचला. या दोघांमुळे पहिल्या डावात रोहित शर्माने केलेली नाबाद ९८ धावांची दणकेबाज खेळी झाकोळली गेली.
मुंबई इंडियन्सने कर्णधार शर्माच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर यजमानांना १६९ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला अँडरसनने धक्का देताना सलामीवीर रॉबिन उत्थप्पाला बाद केले. मात्र मनिष पांड्येने गंभीर सोबत
किल्ला लढवताना दुसऱ्या विकेट्साठी ८५ धावांची भागीदारी केली. यावेळी दबावाखाली आलेल्या मुंबईला
दिलासा देत हरभजन सिंगने पांड्येला बाद केले. पांड्येने २ चौकार व ३ षटकारांसह २४ चेंडूत ४० धावा फटकावल्या. यावेळी मुंबई पुनरागमन करणार असे दिसत असतानाच सुर्यकुमारने तुफान फटकेबाजी करताना सामन्याचा निकाल स्पष्ट केला.
गंभीर बाद झाल्यानंतर कोणतेही
दडपण न आणला सुर्यकुमारने आपला दांडपट्टा चालू ठेवला. गंभीरने ७
चौकार व एका षटकाराने आपली
खेळी सजवली. तर शेवटपर्यंत टिकून राहताना सुर्यकुमारने २० चेंडूत केवळ
१ चौकार मारत तब्बल ५ षटकारांचा नजराणा पेश केला. मुंबईकडून
कोरे अँडरसन, जसप्रीत बुमराह आणि हरभजन सिंग यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. (क्रीडा प्रतिनिधी)