सीए एकादश २४३ धावांत गारद
By Admin | Updated: December 5, 2014 08:55 IST2014-12-05T00:52:36+5:302014-12-05T08:55:36+5:30
वेगवान गोलंदाज वरुण अॅरोनच्या (४ बळी) भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने आजपासून प्रारंभ झालेल्या

सीए एकादश २४३ धावांत गारद
अॅडिलेड : वेगवान गोलंदाज वरुण अॅरोनच्या (४ बळी) भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने आजपासून प्रारंभ झालेल्या दुसऱ्या दोन दिवसीय सराव सामन्यात क्रिकेट आॅस्ट्रेलियाचा डाव २४३ धावांत गुंडळला. फिलिप ह्युजच्या मृत्यूनंतर एक आठवड्याने उभय संघ मैदानावर परतले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, त्या वेळी प्रत्युत्तरात खेळताना भारताने दिवसअखेर २९ षटकांत २ बाद ९९ धावांची मजल मारली होती. सलामीवीर मुरली विजय (३९) आणि प्रभारी कर्णधार विराट कोहली (३०) खेळपट्टीवर होते.
ह्युजच्या दुर्दैवी मृत्यूच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत असलेल्या खेळाडूंनी या सामन्याच्या निमित्ताने मैदानावर पुनरागमन केले. या सामन्याला अधिकृत दर्जा बहाल करण्यात आलेला नाही. भारतीय संघाला नाणेफेक न करताच क्षेत्ररक्षण स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली होती. उभय संघ दोन दिवसांमध्ये प्रत्येकी १००-१०० षटके खेळणार असल्याचे निश्चित करण्यात आले होते. क्षेत्ररक्षणाच्या वेळी संघाचे कर्णधारपद भूषविणाऱ्या ईशांत शर्माने कोहली व रोहित शर्मा यांना विश्रांतीची पूर्ण संधी मिळावी यासाठी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मॅक्सविलेमध्ये ह्युजच्या अंतिम संस्काराला उपस्थित असलेले कोहली व रोहित शर्मा रात्री उशिरा पोहोचले.
ह्युजला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सामन्याच्या सुरुवातीला एक मिनिटाचे मौन पाळण्यात आले. भारतीय खेळाडूंनी काळे आर्मबँड घातले होते. स्कोअर बोर्डवर ‘आरआयपी पी. ह्युज ४०८’ असे लिहिलेले होते. यजमान संघातर्फे जॉर्डन सिल्क आणि यष्टीरक्षक सेब गोच यांनी प्रत्येकी ५८ धावा फटकाविल्या. अॅरोनने सिल्कला माघारी परतवल्यानंतर नियमित अंतरात प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज बाद झाले. एक वेळ आॅस्ट्रेलिया इलेव्हनची ७ बाद १५९ अशी अवस्था झाली होती, पण गोचने दुसऱ्या टोकाकडून संयमी फलंदाजी केली. त्याने संघाला दोनशेचा पल्ला ओलांडून देताना वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. प्रत्युत्तरात खेळताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. शिखर धवन पहिल्याच चेंडूवर चुकीचा फटका खेळून बाद झाला. विजय व पुजारा प्रत्येकी एकदा सुदैवी ठरले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी केली असता पुजारा जोश लालोरच्या गोलंदाजीवर पहिल्या स्लिपमध्ये तैनात कर्णधार अश्टोन टर्नरला झेल देत माघारी परतला. (वृत्तसंस्था)
कोहलीही सुदैवी ठरला. यष्टिरक्षकला कोहलीचा झेल टिपण्यात अपयश आले. त्यानंतर कोहलीने विजयाच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची अभेद्य भागीदारी केली.