महाराष्ट्राच्या खेळाडूंची चमकदार आगेकूच
By Admin | Updated: July 19, 2016 21:27 IST2016-07-19T21:27:25+5:302016-07-19T21:27:25+5:30
अर्जुन सिंग, राहुल धर्रा, मानव मधियान आणि विकास चंद या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार विजय मिळवताना एनएससीआय इंडियन क्लासिक ज्युनिअर ओपन स्क्वॉश चॅम्पियनशीप

महाराष्ट्राच्या खेळाडूंची चमकदार आगेकूच
ज्यु. स्क्वॉश : अमेरिकेच्या चिमुरड्या अनयचा लक्षवेधी खेळ
मुंबई : अर्जुन सिंग, राहुल धर्रा, मानव मधियान आणि विकास चंद या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार विजय मिळवताना एनएससीआय इंडियन क्लासिक ज्युनिअर ओपन स्क्वॉश चॅम्पियनशीप स्पर्धेत १७ वर्षांखालील पात्रता फेरीत विजयी सलामी दिली. त्याचवेळी १३ वर्षांखालील गटात अमेरिकेच्या अनय सावंतने विजयी कूच केली.
वरळी येथील नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडिया (एनएससीआय) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेच्या पात्रता फेरीत अर्जुन सिंगने महाराष्ट्राच्याच मनोजकुमार जैनचा ११-३, ११-३, ११-० असा धुव्वा उडवला. तर राहुलने तामिळनाडूच्या आर्यन स्टीव्ह रीबिनला ११-४, ११-२, ११-२ असे नमवले. मानवने देखील सहज कूच करताना सिध्दार्थ लाठला ११-३, ११-७, ११-४ असे पराभूत केले. विकास चंदने आक्रमक खेळाच्या जोरावर आपल्याच राज्याच्या अर्श नाडकर्णीचे आव्हान ११-९, ११-६, ११-२ असे संपुष्टात आणले.
त्याचवेळी ११ वर्षांखालील गटात आठ वर्षांच्या चिमुकल्या अनय सावंतने सर्वांचे लक्ष वेधताना महाराष्ट्राच्या ध्रुव खन्नाला ८-११, ११-३, ११-६, ११-८ असे पिछाडीवरुन नमवले. त्याचवेळी तब्बल पाच सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात बाजी मारताना महाराष्ट्राच्या तनिष वैद्यने तामिळनाडूच्या मगीझान एस. याचे आव्हान ११-८, ८-११, ११-२, ७-११, १२-१० असे संपुष्टात आणले. (क्रीडा प्रतिनिधी)