ब्राझीलचा धूव्वा उडवत जर्मनी फायनलमध्ये

By Admin | Updated: July 9, 2014 04:20 IST2014-07-09T03:25:17+5:302014-07-09T04:20:14+5:30

यजमान ब्राझीलचा ७-१ ने धूव्वा उडवत जर्मनीने १२ वर्षांनी फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली.

Brazil shock Germany in final | ब्राझीलचा धूव्वा उडवत जर्मनी फायनलमध्ये

ब्राझीलचा धूव्वा उडवत जर्मनी फायनलमध्ये

ऑनलाइन टीम

ब्राझीलिया, दि. ९- यजमान ब्राझीलचा ७-१ ने धूव्वा उडवत जर्मनीने फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. नेमार, सिल्वा या प्रमुख खेळाडूंविना उतरलेल्या ब्राझीलच्या संघाने जर्मनीसमोर सपशेल शरणागती पत्कारली.  तब्बल १२ वर्षांनी जर्मनीने पुन्हा एकदा फायनलमध्ये धडक दिली आहे. 
फिफा विश्वचषकात मंगळवारी रात्री ब्राझील विरुद्ध जर्मनी यांच्यात सेमीफायल पार पडली. जर्मनीच्या अभेद्य बचावाला मोडून गोल करण्याचे आव्हान ब्राझीलसमोर होते. यात भर म्हणजे ब्राझीलचे नेमार, थिअगो सिल्वा हे प्रमुख खेळाडू सेमीफायनलमध्ये खेळणार नसल्याने ब्राझीलसाठी हा सामना कस पाहणारा होता.  सामन्याच्या सुरुवातीपासून जर्मनीने आक्रमकता दाखवली. सामन्याच्या पहिल्याच मिनीटाला ब्राझीलला कॉर्नर किक मिळाली होती. मात्र या संधीचे सोने करण्यात ब्राझीलला अपयश आले. यानंतर ११ व्या मिनीटाला जर्मनीला कॉर्नर किक मिळाली. जर्मनीचा आघाडीचा खेळाडू थॉमस म्यूलरने ही संधी सोडली नाही. म्यूलरने क्रूसच्या पासवर गोल मारुन जर्मनीचे गोलचे खाते उघडून दिले. म्यूलरचे यंदाच्या विश्वचषकातील हे पाचवे गोल असून गोल्डन बूटच्या स्पर्धेत तो आघाडीवर आहे. 
म्यूलरच्या गोलनंतर जर्मनीचा सर्वात अनुभवी खेळाडू मिरास्लॅव्ह क्लोसने २३ व्या मिनीटाला दुसरा गोल मारला. यानंतर मात्र जर्मनीने सहा मिनीटात तब्बल ४ गोल मारुन सामन्यात विजयी आघा़डी घेतली. टॉनी क्रूसने २४ आणि २६ व्या मिनीटाला लागोपाठ दोन करुन संघाला ४-० अशी आघाडी मिळवली. २० व्या मिनीटाला जर्मनीचा मिडफिल्डर सामी खडिराने पाचवा गोल मारला. मध्यांतरापर्यंत जर्मनीने ५- ० अशी आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर जर्मनीचा बदली खेळाडू अँन्ड्रू शर्लेने ६९ आणि ७९ व्या मिनीटाला लागोपाठ दोन मारले आणि संघाला ७- ० अशा भक्कम स्थितीत पोहोचवले. सामन्याच्या शेवटी म्हणजेच ९० व्या मिनीटाला ब्राझीलच्या ऑस्करने एक गोल मारुन ब्राझीलची अब्रू वाचवण्याचा प्रयत्न केला. स्वगृही पराभव झाल्यानंतर ब्राझीलच्या खेळाडूंना मैदानातच रडू कोसळले होते. तर तब्बल १२ वर्षांनी फायनलमध्ये प्रवेश मिळाल्याने जर्मनीच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. बुधवारी अर्जेंटीना विरुद्ध नेदरलँड यांच्यात सामना असून या सामन्यातील विजेता संघ फायनलमध्ये जर्मनीला टक्कर देईल.
 
ब्राझीलचा आत्तापर्यंतचा सर्वात दारुण पराभव
> फिफा विश्वचषकातील बलाढ्य संघ आणि चार वेळा विश्वविजेतेपद पटकावणा-या ब्राझीलचा हा आत्तापर्यंतचा सर्वात दारुण पराभव आहे. यापूर्वी १९९८ च्या अंतिम सामन्यात फ्रान्सने ब्राझीलचा ३-० तर १९३८ मध्ये पोलंडने  ५-० असा पराभव केला होता.  तर आंतरराष्ट्रीय पातळीवर १९२० मध्ये उरुग्वेने ब्राझीलला ६-० ने धूळ चारली होती. 
> २००२ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ब्राझील विरुद्ध जर्मनी हे संघ आमने सामने होते. त्यावेळी ब्राझीलने जर्मनीचा २-० ने पराभव केला. आता १२ वर्षानंतर याच जर्मनीने ब्राझीलचा त्यांच्या घरच्या मैदानातच दारुण पराभव केला. 
> ब्राझीलने विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये सलग सहा वेळा विजय मिळवला होता. मात्र यंदा जर्मनीने त्यांची ही परंपरा मोडून काढली. 
> सेमीफायनलमध्ये एखाद्या संघाचा ऐवढ्या मोठ्या फरकाने पराभव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 
 
जर्मनीचा विश्वविक्रम
ब्राझीलवरील विजयाने जर्मनीच्या खात्यावर अनेक विश्वविक्रम जमा झाले आहेत. 
> सलग चार विश्वचषक खेळणा-या मिरास्लॅव्ह क्लोसने ब्राझीलविरुद्ध गोल मारुन ब्राझीलचाच माजी स्टार फूटबॉलपटू रोनाल्डोला मागे टाकले. रोनाल्डो तीन वर्ल्डकप खेळला असून यात त्याने एकूण १५ गोल केले होते. क्लोसने मंगळवारी या विक्रमाला मागे टाकून सर्वाधिक गोल मारणा-यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. क्लोसने चार वर्ल्डकपमध्ये एकूण १६ गोल मारले आहेत. 
> वर्ल्डकपमध्ये आठव्यांदा फायनलमध्ये पोहोचणारा जर्मनी हा एकमेव संघ आहे. 
> आत्तापर्यंत झालेल्या विश्वचषकांमध्ये ब्राझीलने एकूण २२० गोल मारुन दबदबा निर्माण केला होता. ब्राझीलचा हा विक्रमही जर्मनीने मोडून काढला. जर्मनीने वर्ल्डकपमध्ये २२१ गोल केले आहेत. 
> पहिल्या २९ मिनीटांमध्येच ५ गोल मारणारा जर्मनी हा एकमेव संघ आहे. 
 

Web Title: Brazil shock Germany in final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.