कोलंबियावर मात करत ब्राझील सेमीफायनलमध्ये
By Admin | Updated: July 5, 2014 05:14 IST2014-07-05T03:54:55+5:302014-07-05T05:14:55+5:30
फिफा विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीत यजमान ब्राझीलने कोलंबियाचा २-१ असा पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक दिली.

कोलंबियावर मात करत ब्राझील सेमीफायनलमध्ये
>ऑनलाइन टीम
फोर्टेलेजा, दि. ५- फिफा विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीत यजमान ब्राझीलने कोलंबियाचा २-१ असा पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक दिली. थिएगो सिल्वा आणि डेव्हिड लूईस यांनी मारलेल्या गोलमुळे ब्राझीलला विजय मिळाला. कोलंबियातर्फे जेम्स रॉड्रिग्जने एकमेव गोल मारला. नलमध्ये ब्राझील आणि जर्मनी हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.
फिफा विश्वचषकात उपांत्य फेरीतील दुसरा सामना ब्राझील विरुद्ध कोलंबिया यांच्यात पार पडला. यजमान ब्राझीलला यंदाच्या विश्वचषकात फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नव्हती. तर कोलंबियाने आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला होता. कोलंबियाच्या जेम्स रॉड्रिग्जने विश्वचषकात तब्बल पाच गोल मारुन गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडी घेतली होती. तर ब्राझीलची आघाडी व बचाव फळी अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे शुक्रवारी होणा-या सामन्याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती.
सामन्याच्या सातव्या मिनीटाला ब्राझीलचा कर्णधार थिएगो सिल्वाने कॉर्नर किकवर गोल मारुन संघाला आघाडी मिळवून दिली. पहिल्या भागात कोलंबियाला गोल मारण्यात अपयश आल्याने मध्यान्हापर्यंत ब्राझील १-० ने आघाडीवर होता. मध्यान्हानंतर ६९ व्या मिनीटाला डेव्हिड लूईसने फ्रि किकवर अप्रतिम गोल मारुन संघाला २-० ची आघाडी मिळवून दिली. त्यामुळे कोलंबियाचे आव्हान जवळपास संपल्याची चिन्हे होती. मात्र ७९ व्या मिनीटाला ब्राझीलचा गोलकिपर ज्यूलिओ सिझरच्या फाऊलमुळे कोलंबियाला पेनल्टी किक मिळाली. या संधीचा फायदा घेत रॉड्रिग्जने संघाच्या गोलचे खाते उघडले. विश्वचषकातील रॉड्रिग्जचा हा सहावा गोल होता. मात्र यानंतर कोलंबियाला एकही गोल करत आले नाही व ब्राझीलच्या सेमीफायनलचे तिकीट 'कन्फर्म' झाले.
ब्राझील विरुद्ध जर्मनीची लढत
मंगळवारी ब्राझील आणि जर्मनी यांच्यात सेमी फायनल रंगणार आहे. २००२ च्या विश्वचषकानंतर हे दोन्ही संघ प्रथमच आमने सामने आले आहेत. 2002 मधील अंतिम सामन्यात ब्राझीलने जर्मनीचा २-० ने पराभव करत विश्वचषकावर नाव कोरले होते. विश्वचषक आणि अन्य मालिकांमध्ये हे दोन्ही संघ नऊ वेळा एकमेकांना सामोरे गेले आहेत. यातील पाच सामन्यांमध्ये ब्राझीलने विजय मिळवला तर जर्मनीने २ सामन्यात विजय मिळवला होता. २ सामने अनिर्णित अवस्थेत संपले होते. दरम्यान, मंगळवारच्या सामन्यात ब्राझीलचा कर्णधार सिल्वाला लागोपाठ यलो कार्ड मिळाल्याने तो या सामन्याला मुकणार का याविषयी शंका उपस्थित होत आहे. तर सर्वाधिक गोल मारणा-या खेळाडूंच्या यादीत दुस-या क्रमांकावर असलेला नेमारला दुखापतीने ग्रासले आहे.