..तर बर्मिंगहॅम येथे होणा-या राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 01:25 IST2018-03-17T01:25:25+5:302018-03-17T01:25:25+5:30
राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी या खेळाच्या भविष्याबाबत चर्वितचर्वण सुरू असताना विख्यात पिस्तुल नेमबाज जसपाल राणाने विरोध म्हणून भारताने राष्ट्रकूल स्पर्धेवर बहिष्कार टाकायला हवा, असे म्हटले आहे.

..तर बर्मिंगहॅम येथे होणा-या राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाका
नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी या खेळाच्या भविष्याबाबत चर्वितचर्वण सुरू असताना विख्यात पिस्तुल नेमबाज जसपाल राणाने विरोध म्हणून भारताने राष्ट्रकूल स्पर्धेवर बहिष्कार टाकायला हवा, असे म्हटले आहे.
जगभरातील नेमबाज व राष्ट्रीय महासंघांनी याबाबत चिंता व्यक्त केल्यानंतरही राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने (सीजीएफ) स्पष्ट केले की, नेमबाजी केवळ एक ‘पर्यायी खेळ’ आहे. बर्मिंगहॅममध्ये २०२२ च्या राष्ट्रकूल स्पर्धेत याचा सहभाग राहणार नाही.
पिस्तुल नेमबाजीमध्ये देशातील महान नेमबाज असलेला राणा म्हणाला, ‘केवळ आम्हालाच नाही तर सरकारलाही यासाठी लढा द्यावा लागेल. ज्या क्रीडाप्रकारांमध्ये आपण चांगली कामगिरी करतो तो क्रीडाप्रकार वगळणे सुरू ठेवले तर भारतासाठी ही चांगली बाब नाही. राष्ट्रकुलमधून नेमबाजीला वगळले तर या स्पर्धेवर बहिष्कार टाकायला हवा. चीनने चार आॅलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला नाही आणि ज्यावेळी त्यांनी पुनरागमन केले त्यावेळी ‘क्लीन स्वीप’ केला.’
जसपाल राणा याने पुढे सांगितले की, ‘भारतीय सरकार आता खेळाडूंसाठी बरेच काही करीत आहे. ही सकारात्मक बाब आहे. त्याचा खेळाडूंना मोठा लाभ होत आहे.’ (वृत्तसंस्था)
>पर्यायी गटात समावेश...
गेल्या महिन्यात २०२२ च्या स्पर्धेच्या आयोजकांना लिहिलेल्या पत्रामध्ये सीजीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड ग्रेवेम्बर्ग यांनी म्हटले आहे की,‘२०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीचा समावेश राहणार नाही. सीजीएफने याचे समर्थन केले आहे.’
दरम्यान, खेळाला वगळण्यात येणार नसून पर्यायी गटात याचा समावेश राहील. त्यात यजमान शहर आपल्या राष्ट्रकुल स्पर्धेत याचा समावेश करू शकतो,’ असे ग्रेवेम्बर्ग यांनी स्पष्ट केले.