बॉक्सरची गर्भचाचणी सामान्य बाब
By Admin | Updated: November 7, 2014 01:47 IST2014-11-07T01:47:32+5:302014-11-07T01:47:32+5:30
अविवाहित असलेल्या आणि १८ वर्षांखालील महिला बॉक्सरचे गर्भपरीक्षण केल्याप्रकरणी निर्माण झालेला वाद आता चिघळतो आहे

बॉक्सरची गर्भचाचणी सामान्य बाब
नवी दिल्ली : अविवाहित असलेल्या आणि १८ वर्षांखालील महिला बॉक्सरचे गर्भपरीक्षण केल्याप्रकरणी निर्माण झालेला वाद आता चिघळतो आहे. माजी खेळाडू सुनीता गोदरा हिने याप्रकरणी गुरुवारी जे भाष्य केले त्यामुळे ‘आगीत तेल ओतण्याचा’ प्रकार होण्याची चिन्हे आहेत. सुनीता म्हणते, ‘खेळाडूंची गर्भचाचणी ही सामान्य बाब असते आणि यात काहीही गैर नाही.’
गोदरा पुढे म्हणाली, ‘गर्भवती महिलांना खेळता येणार नाही, असा नियम नाही. पण, आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान खेळाडूला दुखापत होण्याची शक्यता असते. त्यासाठी त्यांना खबरदारी बाळगावी लागते. त्यामुळे ही चाचणी घेणे म्हणजे विशेष बाब नाही.’
गोदरा पुढे म्हणाली,‘कुठल्याही खेळासाठी नियम असतात. त्यात डोपिंग व अन्य वैद्यकीय चाचण्या घेण्यात येतात. खेळाच्या नियमाचे सर्व खेळाडूंनी पालन करणे आवश्यक आहे आणि याला विरोध करणाऱ्या खेळाडूवर बंदी घालण्यात यावी. महिला खेळाडूची गर्भपरीक्षण चाचणी होणे आवश्यक आहे. कारण बॉक्सर्सला अशा परिस्थितीमध्ये दुखापत झाली तर त्यासाठी प्रशासनला दोषी ठरविण्यात येईल.’
प्रसारमाध्यमामध्ये आलेल्या वृत्तामुळे वाद निर्माण झाला आहे. बॉक्सिंग इंडियाने महिला बॉक्सर्सचे गर्भपरीक्षण केले. त्यात ज्युनिअर व अविवाहित खेळाडूंचीही चाचणी घेण्यात आली. प्रसारमाध्यमातील वृत्ताने नवे वळण घेतले आहे. काही राजकीय पक्षांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)