सराव सामन्यात गोलंदाजांची धुलाई, ऑस्ट्रेलिया सर्वबाद ३७१
By Admin | Updated: February 8, 2015 13:27 IST2015-02-08T12:59:48+5:302015-02-08T13:27:34+5:30
विश्वचषकापूर्वीच्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत ३७१ धावांचा डोंगर उभा केला आहे.

सराव सामन्यात गोलंदाजांची धुलाई, ऑस्ट्रेलिया सर्वबाद ३७१
ऑनलाइन लोकमत
अॅडिलेड, दि. ८ - विश्वचषकापूर्वीच्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत ३७१ धावांचा डोंगर उभा केला आहे. डेव्हीड वॉर्नरच्या १०४ धावा आणि ग्लेन मॅक्सवेलच्या तडाखेबाज १२२ धावांच्या खेळीच्या आधारे ऑस्ट्रेलियाने सर्व गडी गमावत ४८ षटकात ३७१ धावा केल्या.
अॅडिलेड येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज सराव सामना सुरु आहे. या सामन्याला अधिकृत सामन्याचा दर्जा नाही. मात्र तिरंगी मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर या सामन्यात चमकदार कामगिरी करुन संघाचे मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे. ईशांत शर्मा दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला असून त्याच्या जागी मोहित शर्माची संघात निवड करण्यात आली होती. या सामन्यात सर्व फलंदाज व गोलंदाजांनी संधी मिळू शकते. यानुसार भारताने आठही प्रमुख गोलंदाजांनी संधी दिली. मात्र एकही गोलंदाज ऑस्ट्रेलियाला रोखण्यात यशस्वी ठरला नाही. सलामीवीर डेव्हीड वॉर्नर आणि मधल्या फळीतील ग्लेन मॅक्सवेल या दोघांनी भारतीय गोलंदाजाची यथेच्छ धुलाई केली. मॅक्सवेलने ५७ चेंडूंमध्ये ११ चौकार व ८ षटकारांच्या आधारे १२२ धावा केल्या. तर सलामीवीर डेव्हीड वॉर्नरने ८४ चेंडूत१०४ धावा केल्या. त्याला अक्षर पटेलने बाद केले. तर मॅक्सवेल हा रिटायर्ड झाला.
ईशांत शर्माऐवजी संघात समावेश झालेला मोहित शर्मा हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने ६ षटकात ६२ धावा दिल्या पण त्या मोबदल्यात शर्माने दोन विकेटही घेतल्या. मोहम्मद शमीने नऊ षटकात ८३ धावा देत तीन विकेट घेतल्या. उमेश यादवने दोन तर स्टुअर्ट बिन्नी व अक्षर पटेलने प्रत्येकी एक विकेट घेतली. भुवनेश्वर कुमार, आर. अश्विन व रविंद्र जाडेजा या तिघांना एकही विकेट घेता आली नाही. आता ऑस्ट्रेलियाच्या ३७२ धावांच्या आव्हानासमोर भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.