बॉम्बे जिमला धक्का
By Admin | Updated: June 11, 2015 00:49 IST2015-06-11T00:49:46+5:302015-06-11T00:49:46+5:30
एमएलडब्लूबी संघाने तीन लढतींपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात बलाढ्य बॉम्बे जिमखाना ‘ब’ संघाचा २-१ असा पाडाव करून मोतीराम स्मृती चषक

बॉम्बे जिमला धक्का
मुंबई : एमएलडब्लूबी संघाने तीन लढतींपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात बलाढ्य बॉम्बे जिमखाना ‘ब’ संघाचा २-१ असा पाडाव करून मोतीराम स्मृती चषक बॅडमिंटन स्पर्धेत चमकदार आगेकूच केली. अन्य एका सामन्यात अनुभवी खार जिमखाना ‘ब’ संघाने चेंबूर जिमखानाचा २-१ असा पराभव केला.
क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एमएलडब्लूबी संघाच्या अमोल हिंदळकर - मनीष कुमार या जोडीने पहिली लढत जतीन अगरवाल - नेवल कुमार यांच्याविरुद्ध २१-२३, २१-१६, १७-२१ अशी गमावल्यानंतरही एमएलडब्ल्यूबी संघाने सलग दोन लढतीत बाजी मारुन सामना जिंकला. यानंतर अमोलने नेवलचा २१-१५, २१-१६ असा पाडाव केला. तर सोमनाथ सोनावणे - ओवेस शेख यांनी गौतम आश्रा - जिमी मास्टर यांचा २१-१९, १५-२१, २१-१९ असा पाडाव करुन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
खार जिमखाना ‘ब’ संघाने आपल्या लौकिकानुसार बाजी मारताना चेंबूर जिमखानाचा २-१ असा झुंजार पाडाव केला. आदित्य छाब्रिया - पुलकीत दालमिया यांनी अमीत शर्मा - क्रिष्णा अगरवाल यांच्याविरुध १६-२१, २१-७, १९-२१ अशी हार पत्करल्याने खार जिम पिछाडीवर पडले. यानंतर मात्र त्यांनी जबरदस्त पुनरागमन करताना झुंजार विजय मिळवला. जेहान आशरने क्रिष्णाचा २१-१३, २१-१३ असा धुव्वा उडवून खार संघाला बरोबरी साधून दिली. तर यानंतरच्या निर्णायक लढतीत अंकित मुनील - विजय मिरपुरी यांनी अनुराग राव - एस. देशपांडे यांचा २१-१०, २१-१८ असा धुव्वा उडवून खार जिमखानाला विजयी केले.
एनएससीआय ‘अ’ संघाने यजमान सीसीआय ‘क’ संघाचा २-० असा फडशा पाडला. प्रतिक-निखिल यांनी राज - केतन यांचा २१-१७, २१-१८ असा पराभव केल्यानंतर मयुर बी.ने झौश एस. याचा २१-१०, २१-१० असा पराभव करुन संघाला विजयी केले.