पुढीलवर्षी रंगणार अंधांचा क्रिकेट विश्वचषक
By Admin | Updated: October 7, 2015 03:06 IST2015-10-07T03:06:02+5:302015-10-07T03:06:02+5:30
अंध खेळाडूंच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्याचसाठी अंध क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. नोव्हेंबर

पुढीलवर्षी रंगणार अंधांचा क्रिकेट विश्वचषक
- महेश चेमटे , मुंबई
अंध खेळाडूंच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्याचसाठी अंध क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये या स्पर्धचे आयोजन होणार असल्याची माहिती महाराष्ट्र अंध क्रिकेट संघटनेचे सेक्रेटरी रमाकांत साटम यांनी ‘लोकमत’ला दिली. मुंबईतील हिंदू जिमखाना व
इस्लाम जिमखाना येथे सध्या
अंधांची महाराष्ट्र चषक क्रिकेट स्पर्धा सुरु आहे, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
भारतीय अंध क्रिकेट संघाने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या अंध विश्वचषकावर पाकिस्तानचा पराभव करुन नाव कोरले. विश्वचषकात पाकिस्तान, बांग्लादेश, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज , श्रीलंका या देशांसह १३ देश सहभागी होणार आहे. यंदाच्या विश्वचषकात तब्बल ४७ सामने खेळवण्यात येणार आहेत. मुंबईसह पुणे, बंगळूर, केरळ येथे हे सामने रंगतील. त्याच बरोबर ओडिशा, कटक, राजस्थान या ठिकाणीही काही सामने आयोजित करण्याचा विचार सध्या सुरु आहे. विश्वचषकाच्या विजयानंतर भारतीय संघाची पंतप्रधानांसह हरियाणा सरकारने दखल घेतली पण महाराष्ट्राच्या सरकारने साधे अभिनंदन देखील केले नसल्याची खंत साटम यांनी व्यक्त केली.
अंध खेळाडूंच्या शारीरिक व सामाजिक विकासासाठी अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. तसेच स्पर्धात्मक गुणांना देखील वाव मिळतो. सध्या आपल्याकडे अंध क्रिकेटसाठी कोणत्याही प्रकारे मदत करण्याची तरतूद नाही.
अंध क्रिकेटसाठी शासनाकडून अनुदानाची अपेक्षा आहे. जगातील श्रीमंत क्रिकेट संघटना म्हणून ओळखली जाणाऱ्या बीसीसीआयने अंध क्रिकेट संघटनेला अद्याप मान्यता दिलेली नाही. गेली दोन वर्ष कोणत्याही मदतीशिवाय आम्ही विश्वचषकावर नाव कोरले. किमान आता तरी सरकार पातळीवर तसेच बीसीसीआय आमच्याकडे लक्ष देईल, अशी माफक अपेक्षा साटम यांनी व्यक्त केली.
...अशी होते सामन्याला सुरुवात
या सामन्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकच्या चेंडूत छर्रे टाकण्यात येतात. जेणे करुन त्या आवाजाच्या दिशेने ते हालचाल करु शकतील. गोलंदाजाने गोलंदाजी करताना ‘अंडरआर्म’ करावी. गोलंदाजाने ‘प्ले’ असे बोलल्यानंतर फलंदाज ‘येस’ असे बोलल्यानंतर सामना सुरु होतो. पूर्णत: अंध जेव्हा एक धाव घेतो, तेव्हा ते दोन धाव म्हणून गृहित धरले जाते.