एफबीआय करणार ब्लाटर यांची चौकशी
By Admin | Updated: June 4, 2015 01:22 IST2015-06-04T01:22:12+5:302015-06-04T01:22:12+5:30
फिफा अध्यक्षपदाचा सेप ब्लाटर यांनी अचानक राजीनामा दिला असला तरी जागतिक फुटबॉल महासंघातील वादळ मात्र अद्याप शमलेले नाही

एफबीआय करणार ब्लाटर यांची चौकशी
झ्युरिच : फिफा अध्यक्षपदाचा सेप ब्लाटर यांनी अचानक राजीनामा दिला असला तरी जागतिक फुटबॉल महासंघातील वादळ मात्र अद्याप शमलेले नाही. भ्रष्टाचाराचे डाग ब्लाटर यांच्या सदऱ्यावरही पडले असल्याची शक्यता आहे.
फेडरल ब्युरो आॅफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) आता विश्व फुटबॉल वर्तुळाला हादरवणाऱ्या कोट्यवधी डॉलर्स भ्रष्टाचाराच्या स्कँडलमध्ये ब्लाटर यांच्या भूमिकेची चौकशी करणार आहे. दरम्यान, इंटरपोलने सहा संशयित व्यक्तींचा ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीत समावेश केला असून त्यात फिफाच्या दोन माजी कार्यकारी सदस्यांचा समावेश आहे.
७९ वर्षांचे स्वित्झर्लंडचे क्रीडा प्रशासक ब्लाटर यांनी मंगळवारी रात्री फिफाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे जगातील सर्वांत श्रीमंत व बलाढ्य क्रीडा महासंघाची धुरा सांभाळण्यासाठी संभाव्य अध्यक्षाबाबत चर्चा सुरू झाली आहे.
ब्लाटर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की,‘फिफाच्या सदस्यांनी मला बहुमत बहाल केले असले तरी सर्व फुटबॉल जगत माझी अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे खूश असल्याचे वाटत नाही. यात फुटबॉल चाहते, खेळाडू, क्लब व फुटबॉलला सर्वस्व मानणाऱ्यांचा समावेश आहे.’
अमेरिकन अधिकाऱ्यांनी १४ फुटबॉल पदाधिकारी व क्रीडा कंपन्यांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांवर १५ कोटी डॉलर्सच्या लाचखोरीचा आरोप केला होता. अमेरिकेचे अटर्नी जनरल लोरेटा लिंच यांनी एफबीआयचे लक्ष्य ब्लाटर असल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. (वृत्तसंस्था)